बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक हा आणखी एक वाहतूक पर्याय उपलब्ध झालेला आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबईत प्रथमच विजेवरील दुचाकी (इलेक्ट्रिक बाईक) सेवा सुरू केली आहे. सर्वप्रथम अंधेरीमधील बस थांब्यांवर ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. बेस्ट उपक्रमाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे बेस्टने या दुचाकी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ७०० दुचाकी सेवेत असून लवकरच आणखी १ हजार दुचाकी सुरू होणार आहेत.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले मोठे यश!)
कुठे कराल नोंदणी
प्रवाशांना या सेवेसाठी वोगो अॅपवर नोंदणी करून या दुचाकी सेवेचा लाभ घेता येता. तुम्ही प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करू शकता. या अॅपमध्ये बेस्ट बस स्थानकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वोगो दुचाकींचा तुम्ही वापर करू शकता.
दुचाकीचे भाडेदर
येत्या सहा महिन्यांमध्ये जवळपास १ हजार दुचाकी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यासाठी अॅपआधारित वीजेवर धावणाऱ्या दुचाकींची सेवा देणाऱ्या कंपनीबरोबर भागिदारी करण्यात आली आहे. बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आणि उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बेस्टने अंधेरीमधील काही थांब्यांवर प्रायोगित तत्वावर वीजेवर धावणाऱ्या दुचाकींची सेवा उपलब्ध केली. या इलेक्ट्रिक दुचाकी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच उभ्या करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका असले. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये असेल आणि त्यापुढील प्रवासासाठी दीड रुपये प्रति मिनिट आकारले जातील.
बेस्ट थांब्यांवर ई-बाईक सेवा
बेस्ट बस पास आणि सुपर सेव्हर योजनेचे वापरकर्तेही दुचाकी वापरू शकतात. यामुळे बस थांब्यावर उतरून प्रवाशांना खासगी वाहनांची वाट न पाहता या दुचाकीने आपल्या इच्छितस्थळी पोहोचता येईल. ऑफिस जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अंधेरीमध्ये ४० ठिकाणी वीजेवर धावणाऱ्या १८० दुचाकी उपलब्ध करण्यात आल्या असून दररोज जवळपास २०० प्रवासी या दुचाकी सेवेचा लाभ घेतात.
सध्या सुरू असणारी सेवा
- विलेपार्ले
- खार
- अंधेरी
- सांताक्रुझ
- जुहू
- वांद्रे
- माहिम
- दादर