बेस्टचे बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु होणार?

बेस्ट उपक्रमाने, १ सप्टेंबर २०२१ पासून बरेच बसमार्ग बंद केले होते. प्रवाशांना किमान १५ मिनिटांच्या अंतराने बसगाड्या उपलब्ध व्हाव्या हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी त्यावेळेस सांगितले होते. बस प्रवर्तनाच्या या अचानक केलेल्या बदलामुळे प्रत्यक्षात मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे बसगाड्यांचे अपेक्षित असलेले १५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तन सध्याच्या काळात ३० ते ४० मिनिटांवर येऊन ठेपले. या संदर्भात ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडे बऱ्याच बस प्रवाशांनी तक्रारी केल्या आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ हतबल; कंत्राटदारांचा मनमानी कारभार)

कायमस्वरूपी बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु करावे

यासंदर्भात शुक्रवार २९ जुलै २०२२ रोजी बेस्ट भवन कुलाबा येथे बेस्ट उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारी रविंद्र शेट्टी यांची ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित भेट घेतली. बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबर २०२१ पासून खंडित, बंद केलेले बसमार्ग पुन्हा पूर्ववत सुरु करण्याबाबत, बसमार्गांचा नव्याने विस्तार करण्याबाबत तसेच प्रवाशांच्या इतर समस्यांवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली. सदर प्रसंगी बेस्ट उपक्रमाचे सहाय्यक वाहतूक अधिकारी सुनिल जाधव, वरिष्ठ वाहतूक अधिकारी प्रशांत मोहरे, संस्थेचे सभासद सिद्धेश कानसे, रुपेश शेलटकर तसेच प्रवासी प्रतिनिधी म्हणून नझीम अन्सारी, विनायक सोनावणे आदी उपस्थित होते.

बेस्टने बंद, खंडित केलेल्या बसमार्गांपैकी बसमार्ग क्रमांक ५०४ मर्यादित हा, देवनार आगार येथे खंडित न करता तो पुन्हा जलवायू विहार खारघर ते वडाळा आगार असा पूर्ववत करावा अशी मागणी सदर बसमार्गावर प्रवास करणारे प्रवासी विनायक सोनवणे यांनी केली. तसेच बसमार्ग क्रमांक ४९४ मर्यादित हा घाटकोपर आगार ते रेती बंदर मुंब्रा ऐवजी मुंब्रा रेल्वे स्थानक असा त्याचा विस्तार व्हावा अशी मागणी सदर मार्गावर प्रवास करणारे प्रवासी नझीम अन्सारी यांनी केली. तसेच कोविड काळात कायमस्वरूपी बंद केलेले बसमार्ग सुद्धा पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी मयुरेश प्रधान यांनी केली. सध्या बेस्टकडे पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्यामुळे हे बसमार्ग पुन्हा सुरु करण्याबाबतच्या निवेदनाबद्दल योग्य तो आढावा घेऊन शक्य तितके बसमार्ग टप्प्या-टप्प्याने सुरु केले जातील असे आश्वासन बेस्टचे मुख्य वाहतूक अधिकारी रविंद्र शेट्टी आणि सहाय्यक वाहतूक अधिकारी सुनिल जाधव यांनी प्रवाशांना दिले.

लवकरच बेस्टच्या बसगाड्यांकरिता विशेष मार्गिका

आगामी काळात पश्चिम दृतगती महामार्गावर फक्त बेस्टच्या बसगाड्यांकरिता विशेष मार्गिका राखून ठेवण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस असून, त्याबद्दलचा प्रस्ताव महाव्यवस्थापक लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे रवाना करणार असल्याचे रविंद्र शेट्टी यांनी सांगितले. बेस्ट बसच्या मार्गातील अडथळा ठरणारी अनधिकृत पार्किंग व्यवस्था आणि फेरीवाले यांच्याबद्दल विशेष मोहीम राबवून बेस्ट प्रवाशांना सर्वोत्तम सेवा बहाल करण्यासाठी प्रवासी संघटना म्हणून ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या संस्थेने बेस्ट प्रशासनाच्या सोबतीने काम करावे असे आवाहन महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी केले होते. त्याप्रमाणे लवकरच आढावा घेऊन नियोजनबद्ध संयुक्त उपक्रम बेस्ट प्रशासनासोबत राबवला जाईल असे संस्थेचे वरिष्ठ सभासद प्रदिप मयेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here