मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमान उड्डाणांकरीता वेगवेगळी टर्मिनल असून सदर टर्मिनल्स, टर्मिनल 1 (T-1) व टर्मिनल २(T-2) या नावाने ओळखली जातात. अनेक प्रवासी टर्मिनल-१ वरून टर्मिनल २ वर जाणारे अथवा विरुद्ध दिशेने विमान बदल करून प्रवास करणारे असतात अशा प्रवाशांना या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान प्रवास करणे सोयीचे व्हावे याकरता बेस्टने ७ एप्रिलपासून वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे.
( हेही वाचा : तेजस्विनी बेस्ट नक्की कोणासाठी ? )
५० रुपये प्रवासभाडे
ही बससेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ टर्मिनल-१ दरम्यान २४ तास सुरू राहणार असून या बस दर २० ते ३० मिनिटांच्या अंतराने संपूर्ण आठवडा कार्यान्वित राहतील. असे बेस्टने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या एका बसफेरीसाठी ५० रुपये प्रवासभाडे आकारण्यात येईल.
बेस्ट उपक्रमाचे आवाहन
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमान प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी T-1 व T-2 दरम्यान प्रवास करताना या किफायतशीर बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.