बेस्ट बस जमीन-पाण्यावर धावणार? उपक्रमाकडून चाचपणी सुरू

120

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने जमीन आणि पाणी या दोन्ही मार्गे धावणाऱ्या बसच्या पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत बैठकाही सुरू असून लवकरच सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. नवा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास प्रवाशांचा प्रवास झटपट होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

( हेही वाचा : SBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ! आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकता गुंतवणूक)

वॉटर बसचा पर्याय

प्रदूषण आणि इंधन समस्येवर तोडगा काढण्यासाठी वॉटर बसचा पर्याय निवडण्याची सूचना गडकरी यांनी उपक्रमाला केली होती यानंतर अशा बसची चाचपणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.

यासाठी दोन प्रकारच्या बसचा पर्याय समोर आहे तो म्हणजे, अ‍ॅम्फिबियस बस जी जमिनीवर आणि पूर्णत: पाण्याखालून प्रवास करून पुन्हा जमिनीवर धावते तर दुसरी, बस ही जमिनीवर आणि त्यानंतर पाण्यावर तरंगत पुढे जाते. या बसच्या चाचपणीविषयी सध्या बैठका सुरू असून बेस्ट अधिकाऱ्यांना त्याचा अभ्यास करण्याची सूचना करण्यात आली आहे असे लोकेश चंद्र यांनी सांगितले. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे यावर सुद्धा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येईल, यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील.

२२२ बस हायड्रोजनमध्ये परावर्तित करणार

विदेशात पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बसेस सेवेत आहेत. काही वर्षांपूर्वी एमटीडीसीने सुद्धा याच धर्तीवर अशा बस सेवेत आणण्याचा निर्णय घेतला होता परंतु हा प्रकल्पनंतर मागे पडला. बेस्ट उपक्रमाने पहिल्या टप्प्यात डिझेलवरील २२२ बस हायड्रोजनमध्ये परावर्तित करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच जमिनीवर आणि पाण्यावर चालणाऱ्या बसच्या पर्यायावर सुद्धा अभ्यास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.