देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण पाहता मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ने आपल्या बस हायड्रोजनवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणाऱ्या 222 बसेसचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. बसचे डिझेल ते हायड्रोजनमध्ये रूपांतर केल्यास वर्षाला 20 कोटी 40 लाख रुपयांची बचत होणार आहे.
डिझेल बसेसचे हायड्रोजनमध्ये रूपांतर
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या काही दिवसांत इंधनावर धावणाऱ्या बेस्टच्या बस हायड्रोजनवर धावताना दिसतील. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच बेस्ट एंटरप्रेन्योर कार्यक्रमासाठी आले होते. केंद्रीय मंत्री गडकरींना बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी डिझेल बसेसचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितले होते. हायड्रोजन बस चालवल्यास दर महिन्याला 1,200 लिटर डिझेलची बचत होईल. सध्या बेस्टकडे 3600 हून अधिक बसेस आहेत. या बस डिझेल, सीएनजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिकवर धावतात. यातील 800 हून अधिक बस डिझेलवर धावतात.
मुंबईत हायड्रोजन बस सुरू करण्याचा बेस्टचा प्रयत्न
इंधनाची बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या बेस्टने मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याच दरम्यान इंधनाची बचत करण्यासाठी बेस्टने हायड्रोजनवर बसेस चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसेस कार्बन डायऑक्साइड सोडतात. त्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतो, त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहने वीज आणि हायड्रोजनमध्ये बदलण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये पुण्यात पहिली हायड्रोजन बस धावली आणि आता मुंबईत हायड्रोजन बस सुरू करण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे.
Join Our WhatsApp Community