रक्तदाब नियंत्रणासाठी ‘बेस्ट’ मोहीम; कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सिम्पल अ‍ॅप

बेस्ट कर्मचाऱ्यांनी कोरोना काळापासून अविरत सेवा दिली त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात रक्तदाबाचा वाढता त्रास लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने सर्व कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी आणि उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे औचित्य साधत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. आता बेस्ट कर्मचाऱ्यांचे आरोग्याची माहिती घेण्यासाठी बेस्ट उपक्रम ‘सिम्पल’ अ‍ॅपची मदत घेणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती उपक्रमाकडे राहिल आणि त्यांना उपचार देण्यास मदत होईल.

( हेही वाचा : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड आरोपींना अटक )

रक्तदाब तपासणी मोहीम

‘नियंत्रित रक्तदाब जिथे स्वास्थ्य दीर्घायु तिथे’ या ब्रीदवाक्याने जागतिक आरोग्य संघटना आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने रक्तदाब तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बेस्ट उपक्रम मुंबईतल्या आगारांमधील ३२ हजार कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी करणार आहे. यामध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करण्यासाठी डिजिटल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. तसेच उच्च रक्तदाब होण्याच्या पूर्वस्थितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत बदल व्हावा म्हणून त्यांना तंबाखू, अमली पदार्थ, आहारात मिठाचा वापर मर्यादित करणे, पुरेशी झोप, मद्याचे व्यसन सोडणे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. मानसिक तणाव करण्यासाठी कामाच्या ठिकाणी ध्यानधारणा व योग विषयावर सहज योग या संस्थेतर्फे प्रत्येक आगारात व्याख्यानांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी अ‍ॅप

‘सिम्पल’ अ‍ॅपच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी वेळेवर औषधे आणि तपासणी वेळेवर करत आहेत का याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच ही तपासणी वेळेत करा असे संदेशही कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार आहेत. रक्तदाब तपासणी संबंधित बेस्ट आगारांमध्येच करण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून रक्तदाब तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून याद्वारे आतापर्यंत १२ हजार कर्मचाऱ्यांची तपासणी केलेली आहे व उपचारही सुरू आहेत. अशी माहिती बेस्टचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिलकुमार सिंघल यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here