बेस्ट उपक्रमांमध्ये कंत्राटी पध्दतीवर घेण्यात आलेल्या खासगी बसेसच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या सहाव्या दिवशी आता आपल्या मागणीत आणखीनच वाढ केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मुद्दयासाठी सुरु केलेल्या या आंदोलनात आता आपल्याला बेस्टमध्येच कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी या कंत्राटी कामगारांनी केली आहे. त्यामुळे खासगी कंत्राट दिलेल्या कंपनीच्या माध्यमातूनच हे आंदोलन पेटवले गेल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता या मागणीमुळे एकप्रकारे नवीन मागणीमुळे कंपनीसह कर्मचाऱ्यांचा मूळ हेतूच स्पष्ट होत आहे. त्यामुळे कंत्राटदारच हे आंदोलन पेटवून आपल्या जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेस्ट उपक्रम तोट्यात जात असल्याने बेस्ट बसेसचे अस्तित्व कायम राखत खासगी कंपनीकडून वाहकांसह बसेसची सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खासगी कंपनीच्या माध्यमातून वाहकांसह घेण्यात आलेल्या या बसेसच्या सेवांमध्ये अनेक चालकांसह कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये नोकरी असल्याचे आमिष दाखवून नोकरी दिली गेली आहे. त्यामुळे यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात असे. त्यातच आता यासर्व कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मुद्दयावरून काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा सहावा दिवस असून सहाव्या दिवशी एकूण ७९६ बस गाडया रस्त्यावर आल्या होत्या. तर वेट लिजच्या एकूण ६०३ बस गाड्यांची सेवा बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त चालकांच्या माध्यमातून घेत रस्त्यावर आणण्यात आल्या होत्या. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारी एसटी महामंडळाच्या एकूण १२२ बस गाडया बेस्ट उपक्रमाच्या बस मार्गावर सुरु होत्या.
मात्र, दुपारी सर्व बेस्ट वेस्टलीज बसचालक आणि वाहकांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना उपक्रमामध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सामावून घेणे शक्य नाही,अशा कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये कंत्राटी तत्वावर सामावून घ्यावे अशाप्रकारची मागणी केली. या प्रमुख मागण्यांसह पुरवणी मागणी करताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेस्टमध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी वयाची अट शिथिल करून वयाची अट ५० वर्षे एवढे करावे. याशिवाय कंत्राटदारासोबत केलेल्या करारात बदल करून कंत्राटदारांची जबाबदारी फक्त बस पुरवठा आणि बस देखभाल या संदर्भात करावी तसेच सर्व मनुष्यबळ बेस्ट उपक्रमाचे असावे असे या मागणीच्या निवेदनात म्हटले आहे.
यासर्व कंत्राटी कामगारांच्या मागणीनंतर आमदार कपिल पाटील सरकारला बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या संपामुळे लक्षावधी प्रवाशांना त्याचा फटका बसत असून याबाबत तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाडे तत्वावर बस गाड्यांवर कार्यरत सर्व कामगारांना बेस्ट उपक्रमाचे कामगार म्हणून घोषित कयन त्यांना कायम कामगारांच्या सेवा शर्ती लागू करून सोयी सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कंत्राटी कामगारांना सापत्न वागणूक न देता मोटर ट्रान्सपोर्ट कामगार ट्रान्सपोर्ट कामगार कायद्यात नमुद सर्व सोयी सुविधा देण्याची मागणी विधान परिषद सदस्या कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे वेतनवाढीच्या मुद्दयावरून पेटलेले आंदोलन आता बेस्टमध्ये कायमस्वरुपी करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचल्याने कंत्राटी कामगारांचे आंदोलन पेटवून एकप्रकारे कंत्राटदार कंपनीला स्वत:ला आपल्या जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community