बेस्ट गाड्यांमध्ये लस प्रमाणपत्र तपासतच नाही! कारण…

87

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या नियमांनुसार सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी केवळ दोन लस मात्रा झालेल्या प्रवाशांनाच परवानगी दिलेली आहे. परंतु अपुरी कर्मचारी संख्या, जास्तीचे बस थांबे यामुळे लसीकरण प्रमाणपत्र तपासणीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुंबईतील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना दुसरीकडे सर्रास विना लसधारक बेस्टमधून प्रवास करत आहेत.

लस प्रमाणपत्र तपासणी

अलिकडेच राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार बेस्ट प्रशासनाकडून लस प्रमाणपत्र (Vaccine Certificate) तपासणी केली जात होती. या आदेशाची २९ नोव्हेंबर २०२१ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला होता. परंतु नव वर्षात बेस्ट उपक्रमाने वाहतूक निरीक्षक, वाहकांमार्फत लस मात्रा प्रमाणपत्राची तपासणी करण्यास सुरुवात केली होती.

( हेही वाचा : सकाळीच ‘कोकण रेल्वे’ ठप्प! जनशताब्दीच्या इंजिनात बिघाड )

अपुरी कर्मचारी संख्या, अधिक बस थांबे

रेल्वे प्रवासावरही दोन लसींची अट असल्यामुळे मुंबईत बेस्टने जवळपास ८० टक्के प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी एवढ्या लोकांचे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी करणे अशक्य आहे. बेस्ट उपक्रमाचे जवळपास २ हजार ५०० बस थांबे व २७ आगार आहेत. या तुलनेत बेस्ट कर्मचारी, चालक, वाहक यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासणे शक्य नाही, असे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, तपासणी दरम्यान एखाद्या प्रवाशाचे लसीकरण झाले नसल्यास त्यामुळे सुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांना धोका उद्भवू शकतो, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.