कर्मचा-यांना केलेल्या मारहाण प्रकरणी बेस्ट कर्मचारी संघटना आक्रमक, पोलिसांना निवेदन देण्यासाठी आवाहन

167

कारचालक आणि त्याच्या साथीदारांकडून बेस्ट बस चालक आणि वाहकाला सोमवारी मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या विरोधात बेस्ट कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झाले असून, या मारहाणीचा निषेध करण्यासाठी समर्थ बेस्ट कामगार संघटनेकडून दहिसर पोलिसांना बुधवारी निवेदन देण्यात येणार आहे.

त्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता दहिसर पोलिस ठाणे, पूर्व येथे सर्व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

बेस्ट कर्मचारी संघटना आक्रमक

समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या आदेशाने आणि सरचिटणीस विलास पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी 11 वाजता दहिसर पोलिस ठाण्याच्या अध्यक्षांना कर्मचा-यांकडून निवेदन देण्यात येणार आहे. दिंडोशी वाहतूक विभागाच्या कर्मचा-यांना अज्ञातांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात पोलिसांना हे निवेदन देण्यात येणार आहे. सोमवार 14 नोव्हेंबर रोजी दहिसर चेक नाका येथे कार चालक आणि त्याच्या साथीदारांकडून बेस्टच्या रुट क्रमांक 705 या प्रवाशांनी भरलेल्या बसवर तुफान दगडफेक करण्यात आली होती.

(हेही वाचाः बेस्ट कर्मचारी संतप्त; मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी)

तसेच, या दरम्यान प्रवाशी व त्या बसवरील चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकरणानंतर बेस्ट कर्मचारी चांगलेच संतापले असून, त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यामुळे आता बेस्ट कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

दहिसर येथे सोमवारी रात्री बेस्ट बसची एका कारशी टक्कर झाली. यावेळी कार चालकाने आपल्या साथीदारांना बोलावून बेस्ट बसवर जोरदार दगडफेक केली, तसेच यावेळी त्यांनी बसचे चालक-वाहक आणि काही प्रवाशांना देखील मारहाण केल्याचे व्हायरल व्हिडिओद्वारे समोर आले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.