‘बेस्ट’चे जुने स्मार्टकार्ड ८ दिवसांत होणार बंद

बेस्ट उपक्रमाने आता जुने स्मार्टकार्ड पूर्णपणे रद्द केले आहे. बेस्टमध्ये प्रवास करण्यासाठी आता नव्याने आणलेल्या स्मार्टकार्डचा वापर केला जाणार आहे. 21 डिसेंबर 2021 पासून CHALO MOBILITY प्रा.लि. या व्यवसाय संस्थेने विकसित केलेल्या “CHALO” या मोबाईल अॅप च्या सहाय्याने बसपास व तिकीट वितरण यंत्रणेचे अद्ययावतीकरण केले आहे. त्यामुळे आता 10 मे 2022 पर्यंत जुने स्मार्टकार्ड रद्द केले जाणार आहे. त्यापूर्वी प्रवाशांनी जुन्या स्मार्टकार्डवरील रक्कमेचा परतावा घेण्याचे परिपत्रक बेस्टकडून जारी करण्यात आले आहे.

लवकरात लवकर अर्ज करा

अन्य प्रवाशांप्रमाणेच दिव्यांग प्रवाशांनादेखील नवीन “CHALO स्मार्टकार्ड” वितरीत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने बेस्ट उपक्रमाने यापूर्वी दिव्यांग प्रवाशांसह सर्व अन्य प्रवाशांना वितरीत केलेले RFID स्मार्टकार्डस् रद्द करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांनी ही प्रणाली सुरु करण्यापूर्वी म्हणजेच 21.12.2021 पूर्वी स्मार्टकार्ड घेतलेले असतील त्यांच्या स्मार्टकार्डची वैधता 10 मे 2022 पासून रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी त्यांच्या स्मार्टकार्डवरील शिल्लक रकमेचा परतावा लवकरात लवकर बेस्ट उपक्रमाकडून करुन घ्यावा. तसेच दिव्यांग प्रवाशांनीदेखील नवीन “CHALO स्मार्टकार्ड” लवकरात लवकर घ्यावीत, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

( हेही वाचा: विमान प्रवाशांना आता २४ तास बेस्टची साथ )

या तारखेआधी घेऊ शकता परतावा

या रकमेच्या परताव्याकरता बेस्ट उपक्रमाला लेखी स्वरुपात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज मूळ ट्रायमॅक्स आरएफआयडी कार्डसह  बेस्ट उपक्रमाच्या नजिकच्या बस आगारात अथवा वडाळा आगार येथील नियोजन विभागात सादर करावा लागणार आहे. अर्ज करताना, अर्जामध्ये आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे. अर्ज सादर केल्यापासून चार ते पाच कार्यालयीन दिवसांत प्रवाशांशी संपर्क साधून शिल्लक रकमेचा परतावा जवळच्या आगारात करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्याकरता लवकरात लवकर आपल्या शिल्लक रकमेचा परतावा घ्यावा. कारण 10 मे 2022 पासून परतावा दिला जाणार नाही. असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here