बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा; अन्यथा होऊ शकते आर्थिक फसवणूक

मुंबईतील बहुतांश ठिकाणी बेस्टमार्फत वीजपुरवठा ( BEST Electricity Department) केला जातो. परंतु मागील काही महिन्यांचे वीजबिल अपडेट नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट SMS वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. नंतर फसवणूक करणारा सदर वीजग्राहकाचा पासवर्ड / ओटीपी चोरतो. त्यानंतर ग्राहकांकडून त्यांच्या बँक खात्यातून फसवणूक करून पैसे काढल्याच्या तक्रारी बेस्ट विद्युत उपक्रमाकडे येत आहेत.

( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)

बेस्ट उपक्रमाचे आवाहन 

याबाबत आता बेस्ट उपक्रमाने ग्राहकांना सतर्क केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या बिलाबाबतचे लघुसंदेश (SMS) नेहमीच कोणत्याही भ्रमणध्वनीवरून न पाठविता ‘BESTSM’द्वारेच पाठविले जातात. जर आपणांस वीजबिलाबाबत अथवा वीजपुरवठा खंडीत करण्याबाबतचा लघुसंदेश (SMS) ‘BESTSM’ व्यतिरिक्त एखाद्या कोणत्याही भ्रमणध्वनीवरुन आल्यास तसेच संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले असल्यास कृपया अशा प्रकारच्या लघुसंदेशांना प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन विद्युत उपक्रमाने ग्राहकांना केले आहे. तुमचा पासवर्ड ओटीपी पिन चोरण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन व्यवहार करण्यास सांगणारा हा फसवा लघुसंदेश असू शकतो. संबंधित प्रभागांसाठी बेस्ट उपक्रमाचे ग्राहक सेवा कॉलिंग क्रमांक बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कोणत्याही मदतीसाठी मार्गदर्शनासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.

९ वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकाविरुद्ध सायबर गुन्हे शाखेत तक्रारी

ग्राहकांना विनंती आहे की अशा कोणत्याही लघुसंदेशाशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी आणि तुमचा पासवर्ड/ओटीपी अशा फसव्या व्यक्तींना देऊ नका व फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवा असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत बेस्ट उपक्रमाकडून ९ वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकाविरुद्ध सायबर गुन्हे शाखेत तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here