बेस्ट उपक्रमातर्फे कर्मचाऱ्यांसाठी रक्तदाब तपासणी शिबीर राबवण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (१४ एप्रिल) पासून सुरू झालेले हे शिबीर जागतिक उच्च रक्तदाब दिनापर्यंत (१७ मे ) राबवण्यात येणार आहे. या काळात वैद्यकीय विभागामार्फत १० हजार बेस्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. उच्च रक्तदाबामुळे अपंगत्वाची शक्यता वाढते. सुमारे एक तृतीयांश भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त असून भारतात दरवर्षी जवळपास २.६ लाख लोकांचा उच्च रक्तदाबाच्या समस्येने मृत्यू होतो. याकरताच बेस्ट उपक्रम रक्तदाब तपासणी शिबीर राबवत आहे.
( हेही वाचा : कोकणात धावली अगीनगाडी…; जन्माची तिच्या अद्भुत कहाणी )
वैद्यकीय सल्ला
- ज्या कर्मचाऱ्यांचे रक्तदाब रीडिंग १३९/८९ पेक्षा कमी आढळेल त्यांना भविष्यात उच्च रक्तदाब टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जाईल.
- ज्या कर्मचाऱ्यांचे रक्तदाब रीडिंग १४०/९० च्या वर आढळेल त्यांना जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ल्याबरोबरच त्यांना योग्य ते उपचार सुरू करण्यात येतील.
- उच्च रक्तदाब असलेल्या सर्व नव्याने निदान झालेल्या तसेच जे आधीच उपचार घेत आहेत त्या बेस्ट कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाब संबंधित इतर आजाराची तपासणी केली जाईल. सर्व आगारातील अधिकारी व कर्मचार्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे निर्देश देऊन वैद्यकीय विभागास सहकार्य करण्यास सांगावे असे आवाहन डॉ. ए. एम सिंगल यांनी केले आहे.