‘बेस्ट’च्या Open Deck बसला प्रवाशांची पसंती! हेरिटेज टूरमधून १ कोटींची कमाई

153

कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यावर बेस्ट बसच्या ताफ्यात निलांबरी या ओपन डेक बसचे आगमन झाले. मुंबईतील ऐतिहासिक वारसा, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ओपन डेक बस ३ नोव्हेंबर २०२१ पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली. अगदी महिन्याभरातच निलांबरीने मुंबईकरांना आकर्षित केले. अल्पावधीतच ओपन डेक बसची लोकप्रियता वाढून ही बेस्ट बस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. हेरिटेज टूरमधून सुमारे ७४ हजार पर्यटकांनी पुरातन वारसा वास्तूंचे दर्शन घेतले आहे.

ओपन डेक बसला मुंबईकरांची पसंती

दक्षिण मुंबईतील महत्वपूर्ण ठिकाणांना भेट देण्यासाठी, मुंबईतील ऐतिहासिक वारसा संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ओपन डेक बसची निवड केली. याचे दर अपर डेकसाठी प्रती व्यक्ती १५० रुपये, तर लोअर डेक ७५ रुपये आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा! आता स्वस्तात बांधता येणार घर; गृहकर्जावरील व्याजदर झाले कमी)

बेस्टच्या या पर्यटन सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत ७४ हजार ७४४ पर्यटकांनी पुरातन वास्तू पर्यटनाचा आनंद घेतला. बेस्ट उपक्रमाला यातून १ कोटी ११ लाख ८३ हजार ७७५ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. १७ मार्चपासून या बसच्या वेळेत बदल करून वाढत्या उकाड्यामुळे या बसची वेळ सायंकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आली होती. यानंतर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

पर्यटक संख्या ( २०२२)

एप्रिल – १३ हजार ८२७
मे – २१ हजार ४५६
जून – १६ हजार ६९२

ओपन डेकचा मार्ग

ओपन बसचा मार्ग गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होऊन, प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह, चौपाटी, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर (मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ऐशायाटिक लायब्ररी, शेवटचे ठिकाण ओल्ड कस्टम हाऊस आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.