कोरोना काळात मुंबईकरांना बेस्ट बसची साथ मिळाली आणि रिक्षा-टॅक्सीचे दर वाढल्यानंतर शहरात प्रवास करण्यासाठी बेस्ट बसला मुंबईकर पहिली पसंती देत आहेत. तसेच बेस्ट उपक्रमाने गेल्या काही महिन्यांमध्ये १ रुपयात प्रवास, दिवाळी ऑफर, नवरात्री विशेष प्रवासी योजना प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यामुळे सध्या बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास ३० लाख इतकी झाली आहे. बेस्टच्या सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या प्रवाशांची सरासरी ३२ लाखांपर्यंत गेली आहे.
( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! डाळींचे दर वाढणार; तूरडाळीचे उत्पादन ३ लाखांनी टनांनी घटले)
मुंबईकरांना बेस्ट बस सेवेला रेल्वेएवढीच पसंती दिली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत तुलना केल्यास बेस्ट प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास सुद्धा महागला आहे. रिक्षाचे कमीत-कमी भाडे २३ रुपये तर टॅक्सी भाडे २८ रुपये झाल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती आता बेस्ट बसला मिळत आहे.
महिला प्रवासी संख्येत वाढ
दरम्यान बेस्टच्या महिला विशेष बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या महिला संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने महिला विशेष बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. कोरोनापूर्व काळात महिला विशेष बसच्या ५४ फेऱ्यांमधून प्रतिदिन २ हजार ५०० महिला प्रवास करत होत्या. परंतु आता ३९३ फेऱ्यांमधून १८ हजार महिला प्रवास करत असल्याची माहिती उपक्रमाने दिली. प्रत्येक फेरीतून सरासरी किमान ४५ महिला प्रवासी प्रवास करत आहेत.
महिना – प्रवासी संख्या – महसूल
- मे – २४ लाख ९३ हजार – १ कोटी ८८ लाख
- जून – २८ लाख १६ हजार – २ कोटी ९ लाख
- जुलै – २८ लाख १३ हजार – २ कोटी ७ लाख
- ऑगस्ट – २९ लाख १८ हजार – २ कोटी ७ लाख
- सप्टेंबर – २९ लाख ८५ हजार – २ कोटी १४ लाख