बेस्टमधून डिजिटल प्रवासासाठी नवा मार्ग! प्रिमियम सेवेला प्रवाशांची पसंती

मुंबई विमानतळ ते दक्षिण मुंबई आणि ठाणे या मार्गावर लवकरच बेस्टची लक्झरी सुविधा सुरू होणार आहे. यासाठी प्रशासन पातळीवर चाचणी सुरू आहे. डिसेंबरमध्ये बेस्ट उपक्रमाने ठाणे ते बीकेसी अशी लक्झरी बससेवा सुरु केली. या सेवेला सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

( हेही वाचा : एसटीतून प्रवास करणा-या महिलांसाठी महत्त्वाची बातमी; महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय)

बेस्टने १२ डिसेंबरपासून ठाणे-वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानकादरम्यान प्रिमियम सेवा सुरू केली. मुंबई विमानतळ ते दक्षिण मुंबई मार्गावरही प्रिमियम सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावर प्रिमियम बस चालवण्याचा विचार सुरू असल्याती माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

खासगी बस, टॅक्सींच्या लोकप्रिय मार्गांचे तपशीलवार सर्वेक्षण केल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या नव्या मार्गांची निवड केली आहे. प्रवाशांना या बसमधून प्रवास करताना चलो अ‍ॅपच्या माध्यमातून आपली जागा आरक्षित करावी लागणार आहे. या बस संपूर्णरित्या डिजिटल असणार आहेत. बसेसमधील सेवा पूर्णपणे डिजिटल असल्याने, या प्रिमियम बसेसमध्ये बस कंडक्टर नसतील आणि प्रवासी टॅप-इन टॅप-आउट सुविधा वापरू शकतील यासाठी प्रवाशांना चलो कार्डाचा वापर करावा लागेल.

ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल या मार्गावर प्रिमियम बससेवा सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत दर अर्ध्या तासांनी, तर वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे अशी सेवा सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७ अशी दर अर्ध्या तासांनी प्रवाशांना उपलब्ध होते. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दोन्ही मार्गावर दररोज ९०० प्रवासी प्रिमियम बसमधून प्रवास करत आहेत.

२०० ई-बस सुरू करणार

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्गांवर २०० ई-बस सुरू करण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे. तसेच परिवहन प्राधिकरणाने पुढील वर्षी जूनपर्यंत ५०० इलेक्ट्रिक वाहनांसह बेस्ट टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी आधीच निविदा काढल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here