बेस्ट उपक्रमाने डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी नवरात्रीप्रमाणे आता सुपर सेव्हर दिवाळी योजना जाहीर केली आहे. दिवाळीमध्ये कोणत्याही मार्गावर फक्त ९ रुपयांत ५ बस फेऱ्यांचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. ही योजना सात दिवस असेल. प्रवाशांना सात दिवसांमध्ये पाच प्रवासी फेरीचा लाभ घेता येणार आहे. अर्थात यापूर्वी बेस्टच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही योजना नसून प्रथमच बेस्टच्या चलो अॅपचा प्रथमच वापर करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. चलो अॅप डाऊनलोड करा आणि ९ रुपयांमध्ये पाच बस फेऱ्या करा, अशीच योजना असून ही दिवाळी योजना आहे की ऍपवरील सबस्क्राईबर वाढण्याची योजना आहे असा प्रश्न पडत आहे.
आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी बेस्ट ‘चलो अॅप’ डाउनलोड केले असून त्यापैकी २५% पेक्षा जास्त बस प्रवासी त्याचा दररोज वापर करत असल्याचा दावा उपक्रमाने केला आहे. प्रत्येक डिजिटल बस प्रवाशांसाठी सुखद प्रवासाचा अनुभव देते, त्याबरोबरच रोख रक्कम हाताळणीचा त्रास कमी होऊन तिकीट छपाईचा खर्च वाचत असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे. बेस्टचे दैनंदिन ३५ लाख प्रवाशांचा आकडा गाठला असून सर्वात जास्त दैनंदिन प्रवासी संख्येचा उच्चांक निर्माण केला असल्याचा दावा उपक्रमाने केला आहे. कोविड पूर्व काळापेक्षा ९ टक्के अधिक प्रवाशी संख्या वाढल्याचे बेस्टने म्हटले आहे.
बेस्टने यापूर्वी स्वातंत्र्यदिनी एक रुपयांची प्रवास योजना तसेच गणेशोत्सव नवरात्री आणि दसरा या दिवशी विविध योजना राबवल्या. ज्याचा लाखो मुंबईकरांनी लाभ घेतला. त्यामुळे १२ लाखांहून अधिक डिजिटल प्रवासी फेऱ्या प्रवाशांनी अनुभवल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे.
दिवाळीची ही योजना १२ ऑक्टोबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. मात्र, ज्यांनी यापूर्वी कधीही बेस्ट ‘चलो अॅप’वर सुपर सेव्हर योजना किंवा डिजिटल तिकीट पूर्वी कधीच खरेदी केलेली नाही, अशा सर्व वापरकर्त्यांसाठी ही योजना उपलब्ध असेल. या योजनेनुसार जे वापरकर्ते पहिल्यांदा डिजिटल प्रदान करत आहेत ते कोणत्याही बसमार्गावर ७ दिवसांच्या कालावधीत ५ प्रवासी फेऱ्या करू शकतात. ही योजना विमानतळ मार्ग, हॉप-ऑन हॉप-ऑफ बस या विशेष बससेवा वगळून सर्व वातानुकूलित आणि विना वातानुकूलित बसेससाठी लागू असेल.
कसा घ्याल ऑफरचा लाभ
फक्त बेस्ट चलो अँप डाउनलोड करा आणि अॅपच्या बस पास पर्यायात जावून ऑफर शोधा. ” दिवाळी ऑफर ” निवडल्यानंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि + UPI डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अथवा नेट बँकिंग इ. द्वारे प्रवासी ऑनलाईन ९ रुपये भरू शकतात.
Join Our WhatsApp Community