सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानचा कर्नाक पूल पाडण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. १९-२० नोव्हेंबरला मध्य रेल्वेच्या १८१० लोकल फेऱ्यांपैकी १०९६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी स्थानकांवरून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या या दादर-पनवेल तसेच इतर स्थानकांवरून सोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने बेस्ट आणि एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली आहे. अद्याप एसटी महामंडळाकडून याचे नियोजन झालेले नाही.
मध्य रेल्वेवरील या २७ तासांच्या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्यासहित मेल-एक्स्प्रेस फेऱ्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम प्रवाशांवर होणार असून यावर उपाय म्हणून विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
मेगाब्लॉक कालावधीत बेस्टकडून जादा गाड्या
- ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाकडे दादर, परेल, भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याची मागणी केलेली आहे.
- या मागणीनुसार बेस्टने १९ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
- बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार, बस क्रमांक १ सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व आणि बस क्रमांक २ भायखळा पश्चिम ते कुलाबा आगारापर्यंत १२ गाड्या सोडण्यात येतील.
- बस क्रमांक ११, सी १०, १४, ए-१७४, ए४५ अशा एकूण ३५ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
- एसटी महामंडळाकडून नियोजन सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाड्या सोडण्यात येणार आहे.