पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आता अशातच १ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास सुद्धा महागला आहे. रिक्षाचे कमीत-कमी भाडे २३ रुपये तर टॅक्सी भाडे २८ रुपये झाल्यामुळे सामान्य लोक आता आम्ही फिरायचे तर कशाने असा सवाल विचारत आहे. यावर आता बेस्ट उपक्रमाने ट्वीट करत उपाय सांगितला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ गिफ्ट! संपूर्ण मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा; बस थांब्यांवरून प्रति किमी फक्त ३ रुपये भाडे)
बेस्ट उपक्रमाचे सूचक ट्वीट
बेस्ट उपक्रमाने रिक्षा-टॅक्सीचे नवे दर लागू करण्यात आल्यावर एक सूचक ट्वीट केले आहे. एकावेळी टॅक्सीने केलेला प्रवास हा पाच बसने केलेल्या प्रवासी तिकिटासमान आहे. असे चित्ररुपी ट्वीट करत उपक्रमाने बस ‘बेस्ट’ आहे असे नमूद केले आहे. साध्या बसने प्रवास करताना प्रवाशांना पाच किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट तर एसी बसचे तिकीट अवघे ६ रुपये आहे. याउलट नव्या दरपत्रकानुसार रिक्षातून पाच किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दिवसा ७७ रुपये, टॅक्सीसाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे बस बेस्ट आहे तुम्ही बसनेच प्रवास करा असे आवाहन उपक्रमाने केले आहे.
— BEST Bus Transport (@myBESTBus) September 30, 2022
ट्विटरवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया
या ट्विटवर बऱ्याच दैनंदिन प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी बेस्टच्या कमी तिकीट दरांबद्दल कौतुक केले आहे, तर अनेकांनी बेस्टला फेऱ्यांची संख्या वाढवा अशी सूचना केली आहे. काही युजर्सने बस अर्धा तास येत नाहीत त्यामुळे आम्हाला रिक्षा-टॅक्सीने प्रवास करावा लागतो असेही नमूद केले आहे आणि याची बेस्ट उपक्रमाने सुद्धा दखल घेतली आहे.
Join Our WhatsApp Community