बेस्ट उपक्रम आणि मुंबई विद्युत पुरवठा विभाग यांनी ‘पुढे चला’ या अभियानांतर्गत दोन चित्रफिती लाँच केल्या आहेत. पुरस्कार प्राप्त चित्रपट निर्माते अभिनय देव यांची निर्मिती असलेल्या या चित्रीफितीमधून सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूर हे दोन कलाकार त्यांच्या लहानपणापासून त्यांनी बेस्ट बसमधून केलेल्या प्रवासांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! चाकरमान्यांसाठी १४ उन्हाळी विशेष गाड्या )
चित्रफितींमधून आठवणींना उजाळा
सर्व मुंबईकरांसारखीच बेस्टने सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूर यांच्या आयुष्यात देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रफितीमध्ये आपण त्यांना ते अनुभवाचे क्षण पुन्हा जगताना पाहणार आहोत. क्रिकेटच्या सरावासाठी शिवाजी पार्कवर वेळेवर पोहोचण्यासाठी आपण भल्या सकाळी कशी बस पकडत होतो, याविषयीच्या आठवणी सांगताना सचिन तसेच मुंबईमधील स्टुडिओमध्ये व ऑडिशन्सकरता जाण्यासाठी आपल्या तेव्हाच्या चेंबूर येथील घरापासून आपण कसे बसने जात होतो, याविषयीच्या आठवणी सांगताना अनिल कपूर यांना आपण या चित्रफितीमध्ये बघणार आहोत.
#ComingSoon, @sachin_rt's story of moving forward in Mumbai's BEST. #PudheChala pic.twitter.com/QWZAD3RCZw
— BEST Bus Transport (@myBESTBus) April 2, 2022
टीजरला प्रचंड प्रतिसाद
दोन्ही कलाकरांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बस प्रवासाचे स्वतःहून आणि दिलखुलासपणे सांगितलेले अनुभव या पटकथेमध्ये गुंफले आहेत. बेस्टने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मदत केली असे सांगत, बेस्ट आता स्वतः तिच्या नवीन डिजिटल बस सेवांसह पुढे जात आहे. या गोष्टीवर प्रकाश टाकत दोघेही चित्रफितीचा शेवट करतात. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी याचा टीजर लाँच करण्यात आला. सोशल मीडियावरती या टीजरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
केवळ ३ महिन्यांमध्ये ‘बेस्ट चलो अॅप’ 10 लाखांहून अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. या नवीन डिजिटल सेवांना मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community