‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे उद्धिष्ट लवकरच साध्य होणार!

123

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्याची आपल्या सर्वांना उत्तम संधी मिळाली आहे. या संधीद्वारे शासनाने दिलेली उद्दिष्टे सर्वांनी मिळून पूर्ण करूया, असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी गुरुवारी केले.

कुपोषणमुक्त जिल्हा रायगड

मुलींचा जन्मदर आणि गर्भ लिंग तपासणीबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अत्यंत समाधानकारक आहे. 1000 मुलांच्या मागे 949 वरून हे प्रमाण 977 झाले आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे. 1 मार्च ते 15 ऑगस्ट या कालावधीत “कुपोषणमुक्त जिल्हा” हे अभियान काटेकोरपणे नियोजन करून यशस्वी करायचे आहे. सध्याच्या आकडेवारीवरून रायगड जिल्ह्यात फक्त 98 कुपोषित बालके आहेत, ही बाब चांगली आहे. तरीही येथील बालकांची पुन्हा तपासणी करून “कुपोषणमुक्त रायगड” हे अभियान यशस्वी करूया, असे जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी सांगितले.

उद्दिष्ट पूर्ण करुया 

अंगणवाडी सेविका भरती कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. अंगणवाड्या लवकरच सुरू होतील त्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू करावी, आपल्या क्षेत्रीय भेटी नियमित कराव्यात, आपल्या कार्यक्षेत्रातील महिला व बालकांची परिपूर्ण माहिती घ्यावी, त्यांच्या नियमित तपासण्या कराव्यात, त्यांना शासनाच्या योजनांची माहिती नियमित द्यावी, अशा सूचना देऊन सर्वांनी मिळून शासनाने या क्षेत्रासाठी ठरवून दिलेले उद्दिष्ट, अपेक्षा पूर्ण करूया, गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. याची पूर्तता करूया, असे अग्रवाल यांनी उपस्थित अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांना शेवटी आवाहन केले. यावेळी  अंगणवाडी सेविकांनी कुपोषणमुक्तीवर आधारित सादर केलेल्या “कहाणी स्वर्ण देशाची” या पथनाट्य सादरीकरणाचेही कौतुक केले.

( हेही वाचा …म्हणून मुख्यमंत्री मलिकांचा राजीनामा घ्यायला धजेनात! )

लोकांचे आयुर्मान वाढले 

जिल्हाधिकारी कल्याणकर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी मुलांना आणि मातांना शासनाकडून सर्व पायाभूत सुविधा प्रदान करण्यात येतात. सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजे अंगणवाडी. महिला व बालकांचा सामाजिक, भावनिक, भौतिक विकास कसा साधला जाईल, याकरता शासन स्तरावर अजूनही विविध  प्रयत्न सुरू आहेत. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना विशेषतः आरोग्यविषयक योजना, माहिती तळागाळापर्यंत पोहोचवल्या जातात. सन 2018 पासून सुरू झालेल्या पोषण अभियानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पोषण आहारामुळे आजची पिढी सशक्त, सुदृढ दिसून येत आहे. भारत सर्वात जास्त तरुण पिढी असलेला देश आहे. पूर्वी लहान बालकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. मात्र आता हे प्रमाण समाधानकारकपणे कमी झाले आहे. लोकांचे आयुर्मान वाढले आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, पोषण आहार, लसीकरण यामुळे रोगराई कमी होऊन मृत्यूदर कमी झाला आहे. धडधाकट पिढी तयार होत आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात रायगडचे काम तर उल्लेखनीय आहे.

स्मार्ट अंगणवाड्यांची आवश्यकता

31 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील किमान तीन टक्के निधी हा महिला व बाल सशक्तीकरणासाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून येत्या काळात अंगणवाडी सुधारणा कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी करू. सध्याच्या अंगणवाड्या “स्मार्ट” अंगणवाड्या करण्यासाठी आवश्यकता असेल तेथे सीएसआर निधीची मदत घेण्यात येईल. जिल्ह्यात जवळपास 3 हजार 600 अंगणवाड्या आहेत. सन 2021-22 या आर्थिक वर्षात त्यापैकी 55 अंगणवाड्यांची नवीन बांधकामे, 54 अंगणवाड्यांची दुरुस्ती कामे, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत 22 अंगणवाड्यांची दुरुस्ती अशा 131 अंगणवाडी केंद्रांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.

( हेही वाचा: तुम्ही WhatsApp ग्रृपचे अ‍ॅडमिन आहात का? वाचा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.