गर्भश्रीमंताकडून घरी घरगडी म्हणून ठेवणाऱ्या परप्रांतीय नोकरांची पार्श्वभूमी न पहाताच त्यांना नोकरीवर ठेवले जाते. मात्र हेच नोकर काही महिने प्रामाणिकपणे काम करून मालकांचा विश्वास संपादन करतात आणि संधी मिळताच घरातील लाखो, करोडो ऐवजावर डल्ला मारून रफुचक्कर होतात. मुंबईतील पश्चिम उपनगरे, तसेच दक्षिण मुंबईत या घटना सतत घडून देखील गर्भश्रीमंताकडून नोकरांची पार्श्वभूमी न तपासता नोकरांना कामावर ठेवले जात असल्याचे अद्याप देखील सुरूच आहे.
बिहार राज्यातून या नोकराला त्याच्या दोन सहकाऱ्यासह अटक
जुलै तसेच ऑगस्ट महिन्यात दक्षिण मुंबईतील मलबार हिल, गावदेवी, मरीन ड्राईव्ह, पेडर रोड, ताडदेव या परिसरात नोकराने चोरी केल्याच्या अनेक घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. त्यापैकी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावदेवी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात नोकराने तब्बल २ कोटींचा ऐवज चोरी करून पळून गेल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा माग काढत बिहार राज्यातून या नोकराला त्याच्या दोन सहकाऱ्यासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिघेही जण सराईत गुन्हेगार असून त्यापैकी मुख्य आरोपी नोकर हा मार्च महिन्यात आर्थर रोड तुरुंगातून एका चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.
(हेही वाचा : ‘ती’ चूक होण्यापासून भाजपने शिवसेनेला सावरले!)
अशी होती मोडस ऑपरेंडी!
घरगडी म्हणून श्रीमंतांच्या घरी काम करायचे काही महिने काम केल्यानंतर संधी मिळताच लाखो रुपयांच्या ऐवजासह तेथून पसार व्हायचे. मुखिया (२१) बच्चन मुखिया (२० ) आणि फुलो मुखिया (४०) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे एकमेकांचे नातेवाईक असून बिहार राज्यातील दरभंगा येथील गोतोहितेला या गावचे राहणारे आहेत. फुलो याच्यावर १० पेक्षा अधिक चोरी, घरफोडीचे गुन्हे असून बच्चन आणि चंदन यांच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरगडी म्हणून श्रीमंतांच्या घरी काम करायचे काही महिने काम केल्यानंतर संधी मिळताच लाखो रुपयांच्या ऐवजासह तेथून पसार व्हायचे, अशी गुन्ह्याची पद्धत या तिघांची आहे. फुलो हा प्रत्येक वेळी गावावरुन नात्यातील तरुणांना मुंबईत आणून त्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन वॉचमन, इतर नोकराच्या ओळखीने त्यांना श्रीमंतांच्या घरी नोकरीला ठेवत असे.
१ कोटी ९० लाख रुपयांच्या ऐवजासह पळून गेला
चंदन मुखिया याला दोन वर्षांपूर्वी एका श्रीमंतांच्या घरी चोरी केल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुरुंगातील कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले, त्यावेळी चंदन देखील तुरुंगातून बाहेर आला होता. त्या नंतर तो दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथील एका व्यापाऱ्याच्या घरी ओळखीतून घरगडी म्हणून नोकरी लागला होता मालकाने त्याची कुठलीही पार्श्वभूमी न तपासता त्याला कामावर ठेवून घेतले होते. वर्षभर काम केल्यानंतर मालकाचा विश्वास संपादन केला होता. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात व्यापारी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह लोणावळा येथे गेले होते, घरी चंदन आणि दुसरा नोकर हे दोघेच घरी होते. चंदन याने या संधीचा फायदा घेऊन मालकाचा घरातील कपाटात असलेलं सोनेनाणे, दागिने असा सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांच्या ऐवजासह पळून गेला होता. दुस्र्या दिवशी हा प्रकार दुसऱ्या नोकराच्या लक्षात येताच त्याने मालकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मालकाने मुंबईकडे धाव घेऊन गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चंदन या नोकराचा शोध सुरु केला असता तो आपल्या इतर दोन साथीदारांसह कुर्ला टर्मिनस येथून ट्रेन पकडून बिहार येथे पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर, पोनी. विजय धनावटे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस उपनिरिक्षक धनेश सातार्डेकर यांच्या पथकाने माग काढत बिहार येथून तिघांना अटक करून त्यांनी घरात एका प्लास्टिक पिशवीत दडवून ठेवलेले चोरीचे दागिने असा एकूण दीड कोटी रुपयांचा ऐवज जप्त करून तिघांना मुंबईत आणण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी फुलो याने चोरीच्या पैशावर गावी मोठी संपत्ती घेतली असल्याचे समजले, गावी तीन घरे, जीप, ट्रॅक्टर, स्पोर्ट बाईक, दोन साध्या बाईक आणि दोन रॉयल एन्फिल्ड या गाड्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्व वस्तू आणि संपत्ती चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community