स्वा. सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक भागवताचार्य वा. ना. उत्पात कालवश 

129

मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक,   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे सोमवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.

वा.ना. उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसार केला. स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. कै. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्मक्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. ते येथील प्रसिध्द शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. आयुष्यभर वा.ना. उत्पात यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २५ वर्षे श्रीमद् भागवत व रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली.

१८ पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. कै. वा.ना. उत्पात यांनी अनेक वर्षे पत्रकारीता क्षेत्रात ही काम पाहिले होते. कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक होते. तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांतीमंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. कै.वा.ना.उत्पात हे उत्पात समाजाचे चेअरमन होते. त्यांच्या पश्‍चात चार मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.