- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन सोमवारी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. यात अँटॉप हिल मध्ये जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजनासह विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले जाणार असून हा कार्यक्रम सोहळा दादर (पश्चिम) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात भागोजी कीर यांच्या प्रस्तावित स्मारक नजीक हा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर; मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार यामिनी यशवंत जाधव, आमदार सदा सरवणकर, आमदार अमीन पटेल, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह आणि अन्य लोकप्रतिनिधी यांनाही या सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे अध्यक्षस्थानी असतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आदी यावेळी उपस्थित राहतील. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial)
(हेही वाचा – शिवसेनेमध्ये जाऊन Nilesh Rane वैभव नाईकांची डोकेदुखी वाढवणार ?)
प्रस्तावित लोकार्पण व भूमिपूजन होणाऱ्या कामांमध्ये मुंबादेवी परिसर तसेच महालक्ष्मी परिसर विकासकामांचे भूमिपूजन; अँटॉप हिल मध्ये जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन; छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजन; जे. जे. उड्डाणपुलाखाली हो-हो बेस्ट बसेसमध्ये निर्मित कलादालन व वाचनालयाचे लोकार्पण; बधवार पार्क येथील फूड ट्रकचे लोकार्पण; माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या पदपथ (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन; माहीम कोळीवाडा येथील अरुणकुमार वैद्य मार्गालगत पदपथ (माहीम ट्रॅफिक चौकी ते वांद्रे उदंचन केंद्रापर्यंत) सुशोभीकरणाचे भूमिपूजन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मुंबई शहरात पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व असलेल्या ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. विधान भवन, लायन गेट, उच्च न्यायालयासमोर के. बी. पाटील मार्ग, फॅशन स्ट्रीट खाऊ गल्ली, बाणगंगा वाळकेश्वर, अरुणकुमार वैद्य मार्ग माहीम रेतीबंदर समुद्रकिनारा या ठिकाणी सदर स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्यांचे देखील भूमिपूजन या निमित्ताने होईल. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील नगर चौक, फॅशन स्ट्रीट, ग्रँट रोड रेल्वे स्थानक (पश्चिम) येथील ‘पिंक टॉयलेट’ चे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यासोबतच, महानगरपालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस गार्डन व सीसीटीव्ही कॅमेरा कामांचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial)
(हेही वाचा – Irani Cup 2024 : २७ वर्षांनंतर मुंबईच्या हातात इराणी चषक)
त्याचप्रमाणे, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नायगाव, वरळी, कुलाबा, माहीम, भायखळा, शिवडी, शीव (सायन) येथील पोलीस वसाहतींचे लोकार्पण आणि भूमिपूजन; कामगार कल्याण क्रीडा मंडळ येथील नूतनीकरण केल्या जलतरण तलावाचे लोकार्पण; सर ज. जी समूह रुग्णालयातील कॅथ लॅब यंत्रसामग्री आणि नूतनीकरण केलेल्या वॉर्डचे लोकार्पण; कामा व आल्बेस रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राचे लोकार्पण; बालसुधारगृह, उमरखाडी, डोंगरी, डेविड ससून येथील बांधकामांचे लोकार्पण; पोद्दार रुग्णालय (वरळी) येथील आधुनिकीकरण कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
समवेत, वरळी दुग्धशाळा आवारातील बांधकामाचे लोकार्पण; मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे वाहन चालकांसाठी कक्ष नूतनीकरणाचे लोकार्पण; मत्स्यव्यवसाय अंतर्गत माहीम, वरळी, कुलाबा येथील कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन; हाजी अली येथील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन; मुंबई मध्यवर्ती ग्रंथालयात डिजिटल ग्रंथालय तसेच कॉम्पॅक्टर उपलब्धतेचे लोकार्पण या कामांचा यात समावेश आहे. (Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community