भक्ती पार्कला लाभले नक्षत्राचे देणे!

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा नागरी वने (मियावाकी) संकल्पनेची मुहूर्तमेढ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा (पूर्व) येथील भक्ती पार्क उद्यानातून २६ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली होती.

158

भक्ती पार्क उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवा-सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. १२ राशी व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे नक्षत्र उद्यानही यात समाविष्ट आहे. नागरी वने संकल्पनेवर आधारित बनवलेल्या उद्यानात विविध प्रजातींची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास वाढू लागला. शहरातील हे सर्वात मोठे उद्यान असून एकप्रकारे मुंबईला नक्षत्राचे देणेच लाभले आहे.

भक्ती पार्कमधील या नागरी वनातील ५७ हजार झाडे बहरली

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा नागरी वने (मियावाकी) संकल्पनेची मुहूर्तमेढ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा (पूर्व) येथील भक्ती पार्क उद्यानातून २६ जानेवारी २०२० रोजी करण्यात आली होती. भक्ती पार्कमधील या नागरी वनात लागवड केलेल्या ५७ हजार झाडांनी आता चांगलाच जोम धरला असून ती वेगाने बहरत आहेत. शहर भागातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ९८ हजार ३६९ चौरस मीटर इतके आहे. या भूभागाचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. पैकी, ५८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्यान विकसित करण्यात आले आहे. तर उर्वरित ४० हजार चौरस मीटर क्षेत्रावर खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

New Project 3

(हेही वाचा : दादासाहेब फाळके मार्गाच्या फुटपाथवरुन कसे चालाल?)

३ किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक

भक्ती पार्क उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवा-सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा जॉगिंग ट्रॅक पदपथ, गजीबो, हिरवळ (लॉन), रंगबेरंगी फुलझाडे, टॉपिअरी व अद्ययावत सुविधांचा समावेश आहे. उद्यानात देशी, परदेशी औषधी प्रजातींची सुमारे २ हजारपेक्षा मोठी फुलझाडे व फळझाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खैर, सुरंगी, आवळा, अर्जुन, पिंपळ, उंबर, बकुळ, आंबा, जांभूळ, कांचन, बदाम, निलगिरी, फणस, भोकर, बेल, सुरू, रॉयल पाम, कडीपत्ता, नारळ इत्यादींचा समावेश आहे.

२७ प्रजातींचे वृक्ष

भक्ती पार्क उद्यानात १२ राशींचे व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे नक्षत्र उद्यान फुलले आहे. विशेष म्हणजे यातील बरीच झाडे दुर्मिळ आहेत. नक्षत्र उद्यानाला भेट देणार्‍याला आपल्या राशीचे कोणते झाड आहे, याची माहिती मिळते. राशी व नक्षत्रानुसार एकूण २७ प्रजातींचे मोठे वृक्ष असून यामध्ये वड, पिंपळ, आवळी, उंबर, जांभळी, खैर, वेलु, नागचाफा, पळस, बेल, अर्जुन, सांबर, फणस, शमी, रुई, कडूलिंब, मोह, इत्यादींचा समावेश आहे.

New Project 4

तरुणांनाही भुरळ पडणारे उद्यान

या उद्यानातील मियावाकी संकल्पनेवर आधारित नागरी वन प्रकल्पात जवळपास ५७ हजार इतक्या संख्येने व प्रामुख्याने देशी व औषधी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात पळस, बेहडा, सीताफळ, बेल, पेरू, सीता, अशोक, हरडा, खैर, बदाम, काजू, रिठा, बकुळ, आवळा, अर्जुन अशा प्रजातींचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये सदर वृक्षांचे घनदाट जंगलात रूपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत विविध प्रजातीची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास म्हणून देखील हे उद्यान विकसित होत आहे. निरनिराळ्या प्रजातींची झाडे विपुल प्रमाणात एकाच उद्यानात उपलब्ध असल्याने अनेक किशोरवयीन विद्यार्थी तसेच वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरिक या उद्यानास भेट देतात. पक्षीनिरीक्षण करणार्‍यांसाठी हे उद्यान म्हणजे पर्वणीच ठरत आहे.

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाचे नवीन लोकेशन

विस्तीर्ण व विविध वैशिष्ट्यांमुळे या उद्यानाचे सौंदर्य सिनेसृष्टीला देखील खुणावते आहे. या उद्यानात चित्रपट तसेच जाहिरातींचे चित्रिकरण करण्यासाठी वाढती मागणी असून महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार विहित शुल्क आकारून चित्रिकरणाकरिता परवानगी देण्यात येते. मुंबई महानगरातील अनेक कॉर्पोरेट/व्यावसायिक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांसाठी विविध खेळाचे सामने या उद्यानाचा भाग असलेल्या मैदानी भागाच्या हिरवळीवर महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन व आवश्यक शुल्क भरुन आयोजित करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.