ड्रीम मॉलमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर! भाजप नगरसेविकेचा आरोप

त्यामुळे आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.

105

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये एक वर्षापूर्वी म्हणजेच 25 मार्च 2021 रोजी भीषण आग लागून, ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पुन्हा शुक्रवारीही बंद असलेल्या मॉलला आग लागल्याने या आगीच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या मॉलमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर होत असून, त्यांच्यामुळेच तर ही आग लागली नसावी ना, अशी शंका उपस्थित करत भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.

बंद मॉलमध्येही आग

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये २५ मार्च २०२१ रोजी सनराईज रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी ९ जणांचा आगीच्या धुरामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच, त्या रुग्णालयात दाखल २ कोविड रुग्णांचाही मृतांमध्ये समावेश होता. त्यानंतर या आगीची चौकशी लावण्यात आली होती, त्यावेळेपासून मॉल हा बंद स्थितीत आहे. मात्र या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच, शुक्रवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास पुन्हा एकदा याच मॉलमध्ये अचानक आग लागली. ही आग हळूहळू भडकली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण रात्रभर १५ फायर इंजिन व ११ वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्याचे काम केले. अखेर पहाटे ४.५६ वाजता ही आग संपूर्णत: विझल्याचे आढळून आले.

चौकशीनंतर सत्य समोर येणार

भांडुपमधील भाजपच्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. मॉल वर्षभर बंद होता. मात्र त्या मॉलमध्ये गर्दुल्ले, घुसखोरांचा नशेकरता वावर होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे या आगीबाबत संशयाचा धूर पुन्हा एकदा गडद झाला असून, कदाचित त्या गर्दुल्ल्यांमुळेच त्या मॉलला आग लागली नाही ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्यावतीने केल्या जाणाऱ्या चौकशीतूनच खरे कारण समोर येईल.

या आगीच्या घटनेनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी परिमंडळ उपायुक्त देवीदास क्षिरसागर, एस विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.