कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी 28 मार्च आणि मंगळवारी 29 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बॅंक युनियननेही या भारत बंदमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील बॅंक कर्मचारी कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी या संपात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील 7 शाखांतून काम करणारे जवळजवळ 30 हजार बॅंक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. केंद्रातील कामगार संघटनांच्या कृती समितीने केंद्राचे धोरण हे कर्मचारी विरोधी असल्याचे सांगत भारत बंदची हाक दिली आहे.
या क्षेत्रातील कर्मचारीही होणार सहभागी
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. संपकरी कामगारांना रोखण्यासाठी अनेक राज्यात अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोडवेज, वाहतूक, ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. तसेच कोळसा, स्टील, ऑईल, टेलिकॉम आणि पोस्टल सेवा, आयकर विभाग, बॅंक तसेच विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्यासाठीची सूचना दिली आहे.
बॅंक सेवाही राहणार बंद
केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी, शेतकरी विरोधी, जनता विरोधी आणि राष्ट्रविरोधी धोरणामुळेच या संपाची हाक देण्यात आली आहे, असे कर्मचारी संघटनांनी सांगितले आहे. बॅंक युनियनही सरकारच्या खाजगीकरणाविरोधात संपात उतरणार आहे. याआधी केंद्र सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पात बॅंकाच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती.
( हेही वाचा: लतादीदी गायन सोडणार होत्या, तेव्हा वीर सावरकर यांनी दिला होता ‘हा’ सल्ला! )
हे कर्मचारी वर्गही संपात उतरणार
बॅंक कर्मचा-यांच्या संपामुळे मोठ्या प्रमाणात सेवांवर परिणाम होणार आहे. कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, डाक विभाग तसेच विमा क्षेत्रातील कर्मचारी वर्गही या संपात सहभागी होणार आहे. तसेच, रेल्वे आणि संरक्षण विभागाचे कामगारही या संपात उतरणार आहेत.
Join Our WhatsApp Community