महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथील रेप्टाकोस ब्रेट कंपनीच्या सुविधा भूखंडावर भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सरकारच्या माध्यमातून विकसित करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्चमध्ये सरकारकडे केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेंतर्गत निधी वितरित केला असून, संगीत विद्यालयाच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कामाकरता याच आर्थिक वर्षांच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून पाच कोटी रुपये इतका निधी वर्गही झाला असल्याची माहिती सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
राज्य सरकारची मंजुरी
भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय सरकारच्या माध्यमातून निर्माण करुन लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करावी, जेणेकरुन त्यांचे स्मरण कायम होत राहील, यासाठी ठाण्यात लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय सुरु करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. तसेच हे संगीत विद्यालय उभारण्यासाठी जवळपास 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारने ठाणे महापालिकेला निधी द्यावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर संगीत विद्यालयाच्या कामास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, हे काम महापालिकेतर्फे होणार आहे.
( हेही वाचा राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढले; एकनाथ शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल )
याच वर्षांत कामाला सुरुवात
- संगीत विद्यालयासाठी येणा-या खर्चाचा 75 टक्के हिस्सा राज्य सरकारचा व 25 टक्के हिस्सा ठाणे महापालिकेचा राहणार आहे.
- आता या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया करुन हे काम प्रत्यक्षात सुरु होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. हे संगीत विद्यालय कसे असेल त्याचा आराखडाही तयार आहे.
- या कामास राज्य सरकारने पाच कोटी निधीसह मंजुरी दिल्याने या कामाची निविदा प्रक्रिया करुन याच वर्षांत संगीत विद्यालय उभारण्याचे काम सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.