मुंबईकरांना खुशखबर! तानसा, मोडकसागर भरला!

तानसा व मोडक सागर तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची निम्मी चिंता मिटली.

मुंबई महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी तानसा तलाव गुरुवारी, २२ जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ मोडक सागर धरणही भरून वाहू लागले. त्यामुळे मोठ्या तलाव व धरणांपैकी तानसा व मोडक सागर भरून वाहू लागल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची निम्मी चिंता मिटली.

मागील वर्षी २० ऑगस्ट रोजी भरलेला!

हा तलाव गतवर्षी २० ऑगस्ट २०२० रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या २०१९ मध्ये हा तलाव २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधी वर्ष २०१८ मध्‍ये १७ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्‍ये १८ जुलै रोजी तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच सन २०१६ मध्‍ये हा तलाव २ ऑगस्‍ट रोजी भरुन वाहू लागला होता.

(हेही वाचा : मुंबईच्या तलावांत चार दिवसांमध्ये ‘इतका’ वाढला पाणीसाठा!)

आता प्रतीक्षा वैतरणा, भातसाची!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लीटर आहे. यापूर्वी तुळसी तलाव १६ जुलै रोजी भरले होते, तर विहार तलाव दुसऱ्याच दिवशी भरले होते. त्यानंतर मोठ्या तलावांपैकी तानसा तलाव भरल्याने आता प्रतीक्षा होती ती मोडक सागर धरणाची. पण तेही गुरुवारी सकाळी भरले. मोडक सागर तलावही सकाळी भरून वाहू लागले, या धरणाचे दोन गेट सकाळी उघडण्यात आले. त्यामुळे तानसा आणि मोडक सागर धरण भरल्याने आता प्रतीक्षा आहे ती मध्य वैतरणा आणि भातसा धरणाची.

गुरूवारी सकाळपर्यंत या सर्व धरणात व तलावांत ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे एकूण साठ्याच्या ५३.८६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीएवढा आहे. मागील वर्षी याच दिवशी सर्व तलाव व धरणात २८.७७ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर त्या आधीच्या वर्षी तो पाणीसाठा ५३.७६ टक्के एवढा होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here