सोशल मीडियामुळे खरे टॅलेंट समोर येत आहे. (Bhau Torsekar) घटनेने दिलेले आविष्कार स्वातंत्र्य सोशल मीडियामुळे खऱ्या अर्थाने वापरले जात आहे. सोशल मीडियामुळे पत्रकारिता समाजात खरोखर झिरपली. मला एक ट्रकचालकाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत पहायला मिळाला. राजेश ट्रक ड्राइवर नावाचे एक यु ट्युब चॅनेल आहे. त्याच्या व्हिडिओला लाखो views आहेत. याला एवढे views का मिळतात, हे शोधतांना लक्षात आले, तो खरा पत्रकार आहे. त्याची मांडणी सकारात्मक आहे. तो वर्षाचे साधारण ३३० दिवस रस्त्यावर असतो; पण तो खड्ड्यांबद्दल बोलत नाही. तो म्हणतो ‘रस्ता बन रहा है’ आणि सुप्रिया ताईंना प्रत्येक रस्त्यावर खड्डा दिसतो. तुम्ही रस्ता किती वापरता ? तुम्ही नकारात्मक पहाता आणि तो ट्रक ड्राइवर सकारात्मक पाहतो. रस्ता होणार आहे. पुढे जाऊन त्रास दूर होणार आहे, हे तो पाहतो, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काढले. ते ‘काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता गौरव पुरस्कार समारोह समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. (Bhau Torsekar)
पत्रकारितेच्या क्षेत्रात महान कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी ‘कै. काकासाहेब पुरंदरे पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काकासाहेब पुरंदरे पुरस्कार समितीच्या अध्यक्ष अधिवक्ता आरती पुरंदरे-सदावर्ते यांच्या हस्ते हा पुरस्कार भाऊ तोरसेकर यांना देण्यात आला. या वेळी ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन आणि मनसेचे संदीप देशपांडे हेही उपस्थित होते. (Bhau Torsekar)
(हेही वाचा – Sahyadri Express: कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार)
बोजड भाषेतील एकतर्फी पत्रकारिता
आजच्या पत्रकारांना मी पत्रकार मनात नाही. किती मालक संपादक आहेत ? आचार्य अत्रे, ना. भी. परुळेकर, अनंत भालेराव हे मालक संपादक होते. आज कोणीतरी मॅकडोनाल्ड चालवून पैसे मिळवतो आणि मीडिया हाऊस चालवतो. त्याच्या दारात गळ्यात पट्टा बांधलेले संपादक थोडे काही झाले की लगेच आविष्कार स्वातंत्र्य बुडाल्याची बोंब मारतात. ४ पैसे मिळाले की, जरा जातिवंत कुत्रा आपण पाळतो, त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी राहिलेली नाही. जगात पहिल्यांदा संपादकीय मागे घेतले, त्यांना बुद्धिमान म्हणतात. अशाने देवेंद्राचा कुबेरही भीक मागेल. जितके अधिक बोजड करता येईल, तेवढे बोजड लिखाण करतात. पत्रकारितेत तू किती शहाणा आहेस त्याला महत्त्व नाही. आपण लिहिलेले समोरच्याला समजले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आता सगळे एकतर्फी झाले आहे. समोरच्याला समजते आहे नाही, काही पाहिले जात नाही, अशी स्थिती तोरसेकर यांनी विशद केली.
काळ्या पैशाशिवाय मीडिया चालत नाही
पत्रकारिता भांडवलदारांची गुलाम होत गेली, तसा पत्रकारितेचा अस्त होत गेला. एका लेखणीवर पत्रकार उभे राहिले. स्वतःचा पेपर काढला आणि चालवला. काळ्या पैशाशिवाय मीडिया हाऊस सुरूच होत नाही. सगळे नामवंत पत्रकार आणि मीडिया हाऊस कोणत्यातरी विदेशी किंवा काळ्या निधीवर माध्यमे चालवतात आणि झेंडा आविष्काराचा दाखवतात, ही विदारक वस्तुस्थिती भाऊ तोरसेकर यांनी कथन केली. ‘मला यु ट्युब कडून मिळणारे पैसे नव्या पिढीला जुन्यांचे लेख वाचता येण्यासाठी पैसे खर्च करणार आहे’, असे भाऊ तोरसेकर यांनी सांगितले.
माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात हे पटत नाही
आचार्य अत्रे यांनी 50 वर्षांपूर्वी भविष्यात काय घडणार आहे, हे सांगितले आहे, असे मला वाटते. आचार्य अत्रे म्हणायाचे, ”सायंकाळी पेपर वाचला की, वाटते मुंबईत काही आपण जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे रात्री बॅग भरायला घेतली, तर सकाळी पेपर वाचल्यावर कळते पुण्यात पण तीच स्थिती आहे. अशा प्रकारे प्रसारमाध्यमे दहशत पसरवतात. कसे सगळे बुडणार आहे, हेच सातत्याने दाखवले जाते. सातत्याने नकारात्मक बातम्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळेच कोरोना काळात माध्यमाना मोठी झळ बसली. कोरोनाने घाव घातला आणि मीडिया सपाट झाला. माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, तेच मला पटत नाही. घटनेत हे कुठे लिहिले आहे, ते दाखवा, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रसारमाध्यमांच्या सध्याच्या स्थितीवर आसूड ओढले. (Bhau Torsekar)
हेही पहा –