भिवंडी शहरातून वाहणा-या कामवारी नदीतील प्रदूषणाबाबत मानवी हक्क आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे भिवंडी पालिकेने ऐन पावसाळ्यात नदीतील जलपर्णी काढण्याचा घाट घातला आहे. येत्या 5 जुलै रोजी मानवी हक्क आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जलपर्णी काढून नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करत असल्याचे दाखवण्याचा भिवंडी महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ब-याच प्रमाणात जलपर्णी वाहून जाते. तरीही आता देखाव्यासाठी हे काम केले जात असल्याचा, आरोप केला जात आहे. हे काम पाहता नदीत येणा-या सांडपाण्यावर उपाययोजना केली जात आहे की नालेसफाई केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( हेही वाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर दीपक केसरकरांचे सडेतोड उत्तर, त्यांनी लिहिलेले पत्र वाचा जसंच्या तसं…)
नदीतील प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया नाही
कामवारी नदीत थेट जेसीबीच्या साहाय्याने जलपर्णी काढली जात असल्याचा, व्हिडिओ ‘हिंदूस्थान पोस्ट’च्या हाती लागला आहे. नदीत जलप्रदूषण होत असेल तर नदीच्या पृष्ठभागावर जलपर्णी येतात. नदीतील वाढत्या प्रदूषणाचे संकेत जलपर्णीच्या वाढत्या प्रमाणावरुन दिसते. मात्र जलपर्णी काढण्यावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप नोंदवला जातो. कामवारी नदीतील प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न झाल्याचे स्पष्ट होत आहे. सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण लपवण्यासाठी हा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. पावसाळ्यात नदीतील प्रदूषणाची पातळी कमी होते. तसेच जलपर्णी वाहून जातात. केवळ आयोगाच्या भूमिकेमुळे आम्ही काम करत आहोत, हे दाखवण्यासाठी जलपर्णी काढली जात नाही ना, अशी चर्चा सुरु आहे.
कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम भिवंडी महानगरपालिका करते. हे काम दरवर्षाला केले जाते.
नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने, जलपर्णी काढली जात आहे. पावसाळ्यात जलपर्णी पूर्णपणे वाहून जात नाही म्हणून ती काढली जात असल्याचे पालिकेने आम्हांला सांगितले. –डॉ भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद