भोपाळमध्ये देवी विसर्जनादरम्यान भरधाव गाडीने भाविकांना चिरडले! आरोपी अटकेत

छत्तीसगडमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जनादरम्यान एका भरधाव कारने भाविकांना चिरडले होते. ही घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये अशीच एक घटना घडली आहे. शनिवारी रात्री दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान, भोपाळ येथे तीन तरुण एका भरधाव कारखाली आले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हे प्रकरण भोपाळच्या बाजारिया पोलिस स्टेशन परिसरातील आहे. भोपाळ पोलिसांनी याप्रकरणी रविवारी उमर (२२) आणि शाहरुख (२३) या दोन युवकांना अटक केली आहे.

सहा जण जखमी 

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी उमर हा ड्रायव्हिंग सीटवर होता, तर शाहरुख पॅसेंजर सीटवर बसला होता. भोपाळ रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी दोघे आले होते आणि घरी परतत असताना त्यांनी निर्दयीपणे त्यांची कार देवी भक्तांवर चढवली. शनिवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकाजवळील बाजारिया परिसरात घडलेल्या या भीषण घटनेत तब्बल सहा जण जखमी झाले.

गुन्हा दाखल

कार चालकाला अटक करण्यात आली आहे आणि वाहन जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळचे पोलीस उपमहानिरीक्षक इर्शाद वाली यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आरोपींंचा आडमुठेपणा

आरोपींना मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग घेण्यास सांगितले गेले होते. परंतु ते न जुमानता त्यांनी शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने दुर्गा विसर्जनात सहभागी झालेल्या भाविकांच्या मार्गात प्रवेश केला. मिरवणूक, चांदबाद ते रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ भाविक थांबले असताना, पुलाच्या बाजूने एक कार वेगाने आली आणि तिने भाविकांना धडक दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here