सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असल्याने,सरकारने अनेक गोष्टींत शिथिलता दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन सुरळीत होताना दिसत आहे. सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना तिकीट आणि पास दिला जात आहे. असे असले तरी प्रवाशांना तिकीट अथवा पास काढण्यासाठी लांबच्या लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. मात्र आता लवकरच प्रवाशांची ही चिंता मिटणार असल्याचे संकेत दिसत आहे. कारण प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. यानुसार, सरकार लवकरच मोबाईल तिकीट अॅप सुविधा सुरु करण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे.
असा आहे रेल्वेचा विचार
दोन लस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच ‘मोबाइल तिकीट अॅप’ सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी) मोबाइल तिकीट अॅप जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आता लोकलने प्रवास करणे अधिक सोईचे होणार आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी मोबाइल तिकीट अॅप सुविधा सुरू करण्यावर चर्चा झाली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात आली.
(हेही वाचा:आता संसदेवर ट्रॅक्टर परेड! असा असेल शेतकरी संघटनांचा गेमप्लॅन)
रेल्वे लवकरच सुरु करणार सुविधा
सुरुवातीला मासिक पास तर त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या सूचनेनंतर तिकीट सुविधाही उपलब्ध करून दिली. एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सेवा आणि मोबाइल तिकीट अॅप सुविधा बंद असल्याने पास आणि तिकीट काढण्यासाठी काही स्थानकांत तिकीट खिडक्यांसमोर गर्दी होऊ लागली. कोरोनाचे रूग्ण कमी झालेत पण धोका कमी झालेला नाही. अशावेळी गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे मोबाइल तिकीट अॅपची सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुनीत शर्मा यांची मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर बैठक झाली. या बैठकीत उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी ‘मोबाइल तिकीट अॅप’ सेवा उपलब्ध करण्यावर चर्चा झाली. यातून प्रवाशांना तिकीट व पास उपलब्ध केल्यास तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सुकर प्रवासासाठी ही सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शर्मा यांनी मध्य व पश्चिम रेल्वेला दिल्या.
Join Our WhatsApp Community