CET Exam मध्ये मोठा घोटाळा; मार्क वाढवून देण्यासाठी २२ लाखांची देवाणघेवाण, चौघे अटकेत

दोन विद्यार्थ्यांनी स्पॅम कॉलद्वारे मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार दिली.

114

राज्यातील सीईटी परीक्षेत (CET Exam) मोठा घोटाळा उघडकीस आला असून एका पेपरमध्ये टक्केवारी वाढवून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हेगार उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या परराज्यातील असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सीईटी (CET Exam) कक्षातर्फे एमबीए, एमएमएस आणि अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

दरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी स्पॅम कॉलद्वारे मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याची तक्रार दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ समिती नेमून चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालात आर्थिक व्यवहाराचे पुरावे समोर आले असून या रॅकेटचा फैलाव देशभरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)

एका पेपरमध्ये (CET Exam) टक्केवारी वाढवून देण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी विविध विद्यार्थ्यांना फोन करून मार्क वाढवण्याचे आमिष दाखवले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा अधिक तपास सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहावे आणि अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले. सीईटी परीक्षा (CET Exam) सुरळीत पार पाडण्यासाठी आणि अशा प्रकारचे प्रकार रोखण्यासाठी सीईटी कक्षाला योग्य ती दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.