बलात्कारासाठी न्यायालयाने दिलेल्या ‘या’ शिक्षेमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

150

एखाद्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार न्यायाधीशांकडून शिक्षा ठोठावण्यात येते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी आपली इच्छा असते. पण या गुन्ह्यासाठी एक आगळीवेगळी शिक्षा बिहारमध्ये देण्यात आली आहे. एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आारोपीला चक्क सहा महिन्यांसाठी गावातील सगळ्या महिलांचे कपडे धुण्याची शिक्षा तेथील न्यायालयाकडून सुनावण्यात आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बिहारच्या मधुबनी येथील न्यायालयाने आपल्या गावात एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सहा महिने गावातील सर्व महिलांचे मोफत कपडे धुण्याची आणि इस्त्री करण्याची शिक्षा देत त्याला जामीन मंजूर केला आहे.

(हेही वाचाः सशुल्क वाहनतळांच्या धोरणात पुन्हा बदल)

का सुनावली आगळीवेगळी शिक्षा?

झंझारपूर न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) अविनाश कुमार यांनी आरोपी लालन कुमार सफी याला जामीन मंजूर करताना स्पष्ट केले की, त्याला पीडित महिलेसह गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुवावे लागतील.
20 वर्षीय आरोपी हा धोबी आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन एप्रिलमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, तो फक्त 20 वर्षांचा असल्यामुळे त्याला माफ करुन सुधारण्याची संधी दिली पाहिजे. वकिलांनी असेही म्हटले की, आरोपी व्यवसायाने धोबी असल्याने तो समाजाची सेवा करण्याचं काम करतो, त्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करावा. त्यामुळे याचा विचार करत महिलांचे कपडे धुणे आणि इस्त्री करण्याव्यतिरिक्त न्यायालयाने आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यापूर्वीही दिली अशीच शिक्षा

सहा महिन्यांच्या सेवेनंतर आरोपीला गावचे सरपंच किंवा त्याच्या मोफत सेवेबाबत कोणत्याही सरकारी अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र त्याला न्यायालयात सादर करावे लागणार आहे. झंझारपूरचे एडीजे अविनाश कुमार यांच्या न्यायालयाने यापूर्वी अशाच एका खटल्यात मोफत काम करण्याची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊन दरम्यान शाळा उघडल्याची अफवा पसरवणा-या शिक्षकाला न्यायालयाने ऑगस्ट 2021 मध्ये गावातील मुलांना मोफत शिकवण्याचे आदेश दिले होते.

(हेही वाचाः मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटींची तरतूद का केली? ॲड. आशिष शेलारांचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.