बिनधास्त काव्याचं बिंगं फुटलं, म्हणून केला होता बेपत्ता होण्याचा बनाव

140

प्रसिद्ध युट्यूबर बिनधास्त काव्या ही अल्पवयीन तरुणी 10 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. रागाच्या भरात घर सोडून निघून गेलेल्या काव्याला पोलिसांनी शोधून काढले होते. पण आता मात्र याबाबत एक वेगळीच माहिती समोर येत आहे. दर्जाहीन प्रसिद्धीसाठी काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी हा बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे.

काव्याचे बेपत्ता नाट्य

संभाजीनगर येथील 16 वर्षांची काव्या ही युट्यूबर म्हणून बिनधास्त काव्या या नावाने प्रसिद्ध आहे. अभ्यासावरुन आईवडील रागावल्याने 10 सप्टेंबर रोजी काव्या ही घर सोडून निघून गेली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी छावणी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान काव्या ही मध्य प्रदेशात पळून जात असल्याचे कळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने पोलिसांनी काही तासांत काव्याला शोधून काढले. तिला खुशीनगर एक्सप्रेसमधून ताब्यात घेत मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावरुन संभाजी नगर येथे परत आणण्यात आले.

प्रसिद्धीसाठी रचला बनाव

दरम्यान, काव्याच्या बेपत्त होण्यामागे ठोस कारण आढळून आले नसल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान या बेपत्ता प्रकरणात काहीही तथ्य नसून काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी मिळवत आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे हीन दर्जाचे कृत्य केल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल होण्याची शक्यता

काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिला शोधून देण्यात आमची मदत करा, अशी विनंती करणारा व्हिडिओ तिच्या आई वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे काव्याच्या बेपत्ता होण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र हा सर्व बनाव असल्याचे आता उघड झाले आहे. पोलिस,रेल्वे, बाल न्याय मंडळ या सर्व यंत्रणांना काव्या आणि तिच्या कुटुंबीयांकडून या पूर्वनियोजित कटासाठी वेठीस धरण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी काव्या आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.