स्मशानभूमींमध्ये जळाऊ लाकडांऐवजी होणार ब्रिकेट्सच्या बायोमासचा वापर: १४ स्मशानभूमींमध्ये वापर

106
जळाऊ लाकडांमुळे होणाऱ्या पर्यावरणाचा -हास व वायुप्रदूषण टाळण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या १४ स्मशानभूमींमध्ये प्रायोगिक तत्वावर या ब्रिकेट्सचा  वापर केला जाणार आहे. यासाठी लाइस ग्रीन इंडिया या कंपनीची नियुक्ती करून त्यांच्याकडून या ब्रिकेट्सची खरेदी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहाच्या जळाऊ लाकडांचा वापर केला जातो, तर काही स्मशानभूमीत विद्युत तसेच पीएनजीवर आधारीत दाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्युत दाहिनीऐवजी पर्यावरणपूरक दाहिन्यांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष केंद्रीत करणाऱ्या महापालिकेने आता मृतदेहाचे दहन करून अंत्यसंस्काराची परंपरा जपण्याच्या दृष्टीकोनातून आता जळाऊ लाकडाऐवजी ब्रिकेट्सच्या बायोमासचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रिकेट्समुळे जळाऊ लाकडाप्रमाणे वृक्ष तोडीला लगाम बसणार आहे.
मुंबई महापालिकेने सन २००८ पासून मृतदेहाकरता  २५० किलोचे जळाऊ लाकडे मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्यासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा कालावधी हा २६ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे महापालिकेने आता २५० किलो लाकडांच्या तुलनेत २५० किलो ब्रिकेट्सचा पुरवठा करण्यासाठी संस्थेची निवड केली आहे. यामध्ये १० रुपये ६० पैसे किलो दराने ब्रिकेट्सचा पुरवठा केला जाणार असून, महापालिका प्रति मृतदेहाकरता २ हजार ३४२ रुपये दराने २५० किलो ब्रिकेट्सची खरेदी करणार आहे.
एखाद्या मृतदेहाच्या दहनाकरता २५०  किलो पेक्षा जास्त ब्रिकेट्स लागल्यास जास्तीच्या ब्रिकेट्सची किंमत महापालिकेच्या दरानुसार मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून वसूल करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर १४ स्मशानभूमींमध्ये या ब्रिकेट्सची खरेदी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने एक वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. याबाबत महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकांची मान्यता प्राप्त झाली असून लवकरच स्मशानभूमींमध्ये जळाऊ लाकडांऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. वृक्षतोड थांबण्यासाठी पर्यावरणाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे ब्रिकेट्स झाडांचा पालापाचोळा, पडलेल्या फांद्या, मृत झाडांची खोडे आदींपासून बनवण्यात येत आहेत. जळाऊ लाकडासाठी जी वृक्ष तोड होत होती, ती आता यामुळे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या स्मशानभूमींमध्ये वापर होणार ब्रिकेट्सचा वापर

  • मंगलवाडी (बाणगंगा) स्मशानभूमी (डी)
  • वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी (ई)
  • गोवारी हिंदू स्मशानभूमी (एफ उत्तर)
  • धारावी हिंदू स्मशानभूमी (जी-उत्तर)
  • खारदांडा हिंदू स्मशानभूमी (एच पश्चिम)
  • वर्सोवा हिंदू स्मशानभूमी (के पश्चिम)
  • मढ हिंदू स्मशानभूमी (पी-उत्तर)
  • वडारपाडा हिंदू स्मशानभूमी (आर-दक्षिण)
  • दहिसर हिंदू स्मशानभूमी (आर उत्तर)
  • चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी (एल)
  • चिता कॅम्प हिंदू स्मशानभूमी (एम पूर्व)
  • आणिक गाव हिंदु स्मशानभूमी  (एम पश्चिम)
  • भांडुप गुजराती सेवा मंडळ स्मशानभूमी( एस विभाग)
  • मुलुंड नागरिक सभा हिंदु स्मशानभूमी (टी विभाग)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.