- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील मलजल प्रक्रिया प्रकल्प केंद्रांचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांची कामे पूर्ण होण्यास अजून काही वर्षे लागणार असून या कालावधीमध्ये या पंपिंग स्टेशनमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे वांद्रे आणि वरळी लव्हग्रोव्ह येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील मलजलावर बायोरेमेडिएशन (Bioremediation) तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या या प्रक्रिया केंद्रासाठी पुढील दोन वर्षांकरता सुमारे २६४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईत मलनिःसारणाकरिता सुमारे २०५२ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या असून या मलजल केंद्रांद्वारे मुंबईतील साधारणतः १४५१ दशलक्ष लिटर सांडपाणी हे कुलाबा, चारकोप, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, भांडुप आणि घाटकोपर या ०८ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमार्फत उत्सर्जित केले जाते. सांडपाणी उत्सर्जित करण्यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांनी जारी केलेल्या तेव्हाच्या निकषानुसार याचे बांधकाम सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये करण्यात आले होते.
(हेही वाचा – Mumbai BJP अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!)
परंतु, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मार्फत सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधून उत्सर्जित करण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या गुणवत्ता निकषांचा स्तर कालांतराने वाढविण्यात आला. या सुधारित निकषांची पूर्तता करण्यासाठी मुंबई मलनिःसारण प्रकल्प (M.S.D.P.) खात्यामार्फत घाटकोपर, भांडुप, वर्सोवा, मालाड, लव्ह ग्रोव्ह वरळी आणि वांद्रे सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार मलजल प्रक्रिया प्रकल्प केंद्रांचे काम हाती घेण्यात आले असून हे प्रक्रिया केंद्र प्रत्यक्षात सुरु होण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने १४ ऑक्टोबर २०२० रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, महानगरपालिकांनी बायोरिमेडिएशन किंवा फायटोरेमीडिएशन वा इतर रेमीडिएशन उपाययोजना करून सांडपाण्याच्या गुणवत्तेच्या सुधारीत निकषांची पूर्तता करावी अशी सूचना केली. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार घाटकोपर, भांडुप, वर्सोवा आणि मालाड येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये बायोरेमेडीएशन तंत्रज्ञानाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राटे यापूर्वीच विविध कंपन्यांना देण्यात आली आहेत. ही कामे मलनिःसारण प्रकल्प विभागाद्वारे नवीन मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Air Quality Index : मुंबईतील २८ बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन, महापालिकेच्या लेखी सूचना)
चार ठिकाणी बायोरेमेडीएशन (Bioremediation) तंत्रज्ञानाद्वारे सुधारीत निकषांची पूर्तता होत असल्याचे पाहता उर्वरित दोन म्हणजेच वरळी लव्ह ग्रोव्ह वरळी आणि वांद्रे सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथे मुंबई मलनिःसारण प्रकल्प विभागाने सुरू केलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या पुनर्रचनेचे काम कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून बायोरेमेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे तेथील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दोन्ही मलजल प्रक्रिया केंद्रांमधील तात्पुरती व्यवस्था म्हणून बायोरेमेडीएशन (Bioremediation) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने यासाठी मेसर्स जे एम इन्फ्रा एन्ड एन्विरी जेव्ही देव इंजिनियर्स या कंपनीची निवड केली आहे. जे एम इन्फ्रा ऍन्ड एन्विरो टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांना शहरी विकास आणि गृहनिर्माण विभाग, बिहार सरकार करिता सन २०२३ ते २०२४ मध्ये प्रतिदिन ७०० दशलक्ष लिटर्स सांडपाण्यावर बायोरेमेडीएशन (Bioremediation) तंत्रज्ञानाद्वारे प्रकिया करण्याचा कामांचा अनुभव आहे. त्यामुळे या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली असून विविध करांसह पुढील दोन वर्षांकरता यावर सुमारे २६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणर असल्याची माहिती मिळत आहे.
किती मलजलावर तात्पुरती प्रक्रिया
वरळी लव्हग्रोव्ह प्रक्रिया केंद्र : वर्षांला १ लाख १० हजार दशलक्ष लिटर सांडपाणी
प्रति दशलक्ष लिटर दर : ३, ५२८ रुपये
वांद्रे प्रक्रिया केंद्र : वर्षांला २ लाख १५ हजार दशलक्ष लिटर सांडपाणी
प्रति दशलक्ष लिटर दर : ३,४५५ रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community