Powai Lake : पक्ष्यांची घरटी आणि त्यांच्या विणीचा हंगाम, पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम थांबवले

जलपर्णी काढण्‍याच्‍या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदविली.

876
Powai Lake : पक्ष्यांची घरटी आणि त्यांच्या विणीचा हंगाम, पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम थांबवले

पवई तलावातील जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारीही महानगरपालिकेने घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्ष्यांची घरटी तसेच त्यांचा विणीचा हंगाम लक्षात घेता जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या लगतची जलपर्णी काढण्याचे काम १० जून २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे. परंतु, आदि शंकराचार्य मार्ग बाजूची जलपर्णी काढण्याची कार्यवाही अखंडपणे सुरु आहे. जलपर्णी काढण्‍याच्‍या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदवल्याने जलपर्णी काढण्याचे काम थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Powai Lake)

पक्ष्यांचा अधिवास आढळला नाही तिथे…

अहवालातील निरीक्षणांनुसार, पवई तलाव येथे ज्या ठिकाणी पक्ष्‍यांचा अधिवास आहे, त्या ठिकाणी या पक्ष्‍यांचा विणीचा हंगाम साधारणपणे दिनांक १० जून २०२४ पर्यंत आहे. प्रामुख्याने जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई यांच्या बाजूस पक्ष्यांची घरटी आढळली आहेत. त्यामुळे विणीचा हंगाम संपल्यानंतर या ठिकाणची जलपर्णी काढण्‍याची कामे करावीत, अशी विनंती पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी केली आहे. ती विनंती मान्य करुन महानगरपालिकेने त्या बाजुचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवले आहे. १० जून २०२४ नंतर त्या बाजूचे काम पुन्हा सुरू केले जाईल. परंतु आदि शंकराचार्य मार्गालगतच्या बाजूस पक्ष्यांचा अधिवास आढळला नसल्याने त्या बाजूचे जलपर्णी काढण्याचे काम निरंतर सुरु ठेवण्यात आले आहे. (Powai Lake)

(हेही वाचा – Covid-19 New Variant: भारतात 290 जणांना कोविडच्या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग, आरोग्य तज्ज्ञ म्हणाले…)

जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर

पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्या निरीक्षणांनुसार, सामान्यपणे दरवर्षी १० जून पर्यंतचा कालावधी हा जलचर पक्ष्‍यांचा प्रजोत्‍पादन/विणीचा हंगाम म्‍हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्‍याच्‍या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदविली. त्‍याची तातडीने दखल घेत बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’ या तज्ज्ञ संस्‍थेशी संपर्क साधत त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन वस्‍तुनिष्‍ठ अहवाल सादर करण्‍याची विनंती केली होती. (Powai Lake)

याठिकाणची केली पक्षी निरिक्षकांनी पाहणी

त्यानंतर, ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’चे प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अधिकाऱ्यांसमवेत पवई तलावास प्रत्‍यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी केली. तसेच, याबाबतचा अहवाल महानगरपालिकेस सादर केला. पाहणी पथकात ‘बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी’च्‍या नियामक मंडळाचे सदस्‍य देबी गोयंका, उपसंचालक राहुल खोत, पक्षीनिरीक्षक तथा पवईतील रहिवासी मैत्रेयी, उषा नुरनी यांचा समावेश होता. (Powai Lake)

शेकाट्या, कमळपक्षी, पाणकोंबडी, टिटवी, अडई पक्षांचा अधिवास

जलवाहिनी मार्गाच्‍या बाजूने पवई तलावाची पाहणी करताना शेकाट्या, बगळे, कमळपक्षी, पाणकोंबडी, बदक, टिटवी, अडई पक्षांचा अधिवास असल्‍याचे निदर्शनास आले. या ठिकाणी हार्वेस्टर यंत्राद्वारे जलपर्णी काढण्‍यात येत असल्‍याने जलचर पक्ष्‍यांच्‍या विहारात व्‍यत्यय निर्माण होत असल्‍याचे लक्षात आले. तर, गणेश घाट या ठिकाणी पाहणी दरम्‍यान तलावामध्ये स्‍वच्‍छता आढळून आली. जलचर पशुपक्ष्‍यांच्‍या विहारासाठी अनुकूल मानली जाणारी स्थिती म्‍हणजे काठावर झाडीझुडपे, वनस्‍पती इत्यादी तलावाच्‍या काठावर आढळून आल्‍या. (Powai Lake)

घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने…

तलावाच्‍या काठावरील झाडीझुडपे, तरंगत्‍या वनस्‍पती या जलचर पक्ष्‍यांच्‍या अधिवासासाठी, घरट्यांसाठी योग्‍य जागा आहेत. तलावाच्‍या काठावर शेकाट्या पक्ष्‍यांची घरटी असल्‍याचे स्‍थानिक पक्षीनिरीक्षकांना आढळून आले. त्‍यामुळे त्या ठिकाणी जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने शक्यतोवर पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती अभ्यासकांकडून करण्‍यात आली आहे. त्याचा देखील प्रशासनाने सकारात्मक अंगीकार केला आहे. (Powai Lake)

पक्ष्यांच्या घरट्यांना यांचाही धोका

दरम्यान, पक्ष्‍यांच्‍या घरट्यांना मोकाट श्‍वान, भटक्‍या जनावरांचा धोका उद्भवतो. ही बाब लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना करण्‍याची विनंती देखील बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटीने केली आहे. त्याचा देखील विचार करुन संबंधित खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वस्त करण्यात आले आहे. (Powai Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.