Veer Savarkar : बडोद्यात घरगुती गणपतीच्या देखाव्यात उभारला नाशिकचा भगूर वाडा

169

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक ठिकाणी सुंदर देखावे उभारण्यात आले. अनेक ठिकाणी चंद्रयान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचे देखावे उभारण्यात आले. असाच एक अनोखा देखावा गुजरात राज्यातील बडोदा शहरातील कुलकर्णी दाम्पत्याच्या घरातील गणपतीसमोर उभारण्यात आला आहे, जो अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

बडोदा, समा भागातील पटेल पार्क विंटेज येथील इमारतीमध्ये संतोष कुलकर्णी आणि नीलिमा कुलकर्णी राहतात. त्यांनी यंदाच्या वर्षी गणपतीसमोर नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे जन्मस्थळ भगूर वाडा उभारला आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे, त्यामुळे आम्ही मागील वर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक उभारले होते. मात्र यंदाच्या वर्षी आम्ही भगूर वाडा उभारण्याचे ठरवले होते. कारण आम्ही मूळचे नाशिक येथील आहोत. आजही जेव्हा जेव्हा नाशिकला जाणे होते, तेव्हा  भगूर वाड्याला भेट दिल्याखेरीज राहवत नाही. त्या वाड्याप्रती विलक्षण स्नेह आहे, असे नीलिमा कुलकर्णी ‘हिंदुस्थान पोस्ट’सोबत बोलताना म्हणाल्या.

(हेही वाचा Khalistani : कॅनडात खलिस्तान्यांकडून गुजराती भाषिकांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल)

या देखाव्यात माझे पती संतोष कुलकर्णी यांची कलाकुसर, तर माझी रंगसंगती आहे. हा देखावा आम्ही १५ दिवसांत उभारला आहे. या देखाव्यासाठी आम्ही प्लायवूड आणि पुठ्ठा वापरला आहे, अशा प्रकारे हा देखावा पर्यावरणपूरक आहे. हेच साहित्य आम्ही पुढच्याही वर्षी देखाव्यासाठी वापरत असतो, असे नीलिमा कुलकर्णी म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर  (Veer Savarkar) आणि भगूर वाडा हा नव्या पिढीला समजावा, त्यांना माहित व्हावा, हा उद्देश या देखाव्यामागील आहे. आमच्या गणपतीला भेट देणाऱ्यांपैकी अनेकांना भगूर वाडा माहित नव्हता, वीर सावरकर म्हटले की अंदमान आणि सेल्युलर जेल इतकेच माहित असते, पण असेच एक कुटुंब आहे ज्यांनी हा देखावा पाहिल्यावर नाशिक येथे भगूर वाड्याला नक्की भेट देणार असे सांगितले. तर एका तरुणाने देखावा पाहिल्यावर घरी जाऊन सावरकर  (Veer Savarkar) वाचायला सुरुवात केली. अनेकांना हा देखावा पाहून त्यांच्या जुन्या घराचीही आठवण झाली, असेही नीलिमा कुलकर्णी म्हणाल्या.

कुलकर्णी दाम्पत्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. त्यांच्या कुळात दीडशे वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मागील ३० वर्षांपासून कुलकर्णी दाम्पत्याने देखाव्यांची परंपरा सुरु केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.