दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिक्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण असून यामध्ये स्थानिक फेरीवाल्यांऐवजी मुंबई बाहेरील फेरीवाले अधिक प्रमाणात आहे. एकेकाळी या भागात स्थानिक मराठी फेरीवाल्यांची संख्या अधिक होती, परंतु आता या भागांमध्ये ७० ते ७५ टक्के मुंबई बाहेरील मुस्लिम अधिक प्रमाणात असल्याने भाजपने आाता या विरोधात आक्रमक पावित्रा घेता आहे. स्थानिक फेरीवाल्यांनी जरुन व्यवसाय करावा, परंतु मुंबई बाहेरुन येवून जर याठिकाणी मुस्लिम फेरीवाले जागा अडवत स्थानिक रहिवाशांसह रेल्वे प्रवाशाना त्रास होईल अशाप्रकारे वर्तन करत असतील तर भाजप हे सहन करणार नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या बाहेरील फेरीवाल्यांवर महापालिकेसह पोलिसांनी कडक कारवाई करावी अशाप्रकारच्या सूचनाच भाजपने दिल्या आहेत.
( हेही वाचा : उस्मानाबादेत उद्धव गटाचे खासदार आणि भाजपाचे आमदार भिडले )
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीचा व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, न्यायायलाच्या निर्देशाचे पालन महापालिका आणि पोलिसांकडून केले जात नसल्याने दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरांत मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढलेली आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त शरद उघडे यांनी सेनापती बापट मार्गावरील केशव उ्डाणपुलाखालील गाळ्यांमधील संस्थांना बाहेर काढून हे गाळे रिक्त केले होते. रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी आणि रेल्वे स्थानकापर्यंत टॅक्सी व खासगी वाहने येतील अशाप्रकारचा आराखडा महापालिकेने तयार केला असला तरी पुढे याची अंमलबजावणी झाली नाही. उलट या रिकाम्या गाळयांचा ताबा फेरीवाले आणि गुर्दुल्ले आदींनी घेत या जागा अडवून ठेवल्या.
कोविड काळामध्ये येथील फेरीचा व्यवसाय बंद असला तरी तेव्हापासूनच मुंबई बाहेरील मुस्लिम व इतर प्रांताचे नागरिक दादरला फेरीचा व्यवसाय करु लागले. त्यामुळे तेव्हापासून दादरमध्ये मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांना तसेच रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या तक्रारींची दखल घेत भाजपच्या माहिम-दादर विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी मागील दोन दिवसांपासून दादर सेनापती बापट मार्गाला भेट देत रस्ता आणि पदपथ अडवून वाहतुकीसाठी तसेच पादचाऱ्यांनाही जागा न सोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात तीव्र कारवाई करायला भाग पाडली. यावेळी फेरीवाल्यांचा म्होरक्या असलेल्या जमाल आणि शमशुद्दीन यांचाही समाचार घेतला. यासंदर्भात बोलतांना भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी आम्ही स्थानिक फेरीवाल्यांच्या विरोधात नाही. परंतु स्थानिक फेरीवाला जर मुंबई बाहेरील व्यक्तीला आणि मुस्लिमांना जागा भाड्याने देत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. स्थानिकांनी स्वत: बिनधास्त व्यवसाय करावा. परंतु ज्याप्रकारे मुंबई बाहेरील फेरीवाल्यांचे वर्तन आहे आणि त्यांच्याकडून स्थानिकांनाही अरेरावीची भाषा केली जाते हे भाजप सहन करणार नाही. आज स्थानिक रहिवाशी आपल्या इमारतीच्या खाली आपले वाहने उभे करू शकत नाही,एवढी यांची दादागिरी झाली असून सर्वोच्च न्यायायलाच्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलिस यांनी सर्वप्रथमच कारवाई न केल्यास याविरोधात स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरु असाही इशारा तेंडुलकर यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community