पवईतील सायकल ट्रॅक बेकायदेशीर असून तो काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या ट्रॅकला पर्यावरणवादी संस्थांनी विरोध केला होता, तसा विरोधी आम्हीही केला होता. तरीही सायकल ट्रॅक उभारला गेला. आता सायकल ट्रॅक तोडण्याचा प्रयत्न केला जात असून यासाठी येणारा खर्च महापालिका अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
पवईतील बांधकाम सुरू असलेल्या जॉगिंग आणि सायकल ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे २०२२ रोजी बेकायदेशीर ठरवले होते. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले होते. तसेच केलेले बांधकाम तात्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्वव्रत करण्यास सांगितले होते. परंतु तसे न करता ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
(हेही वाचा – पी डिमेलो रोडवरून थेट ग्रँट रोडला पोहोचा सात मिनिटांमध्ये; पूर्व मुक्त मार्ग ते कोस्टल रोडला जोडणारे पूल बांधणार महापालिका)
परंतु अखेर पवई तलावातील या सायकल ट्रॅकचे अर्धवट बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने निविदा निमंत्रित केली आहे. हे बांधकाम तोडण्यासाठी ६६ लाख रुपयांची निविदा मागवली आहे. या निविदेनंतर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे अर्धवट बांधकाम तोडण्यासाठी येणारा खर्च महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सायकल ट्रॅकचे अर्धवट बांधकाम तोडण्यासाठी येणारा ६६ लाखांचा खर्च माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. या ट्रॅकसाठी करदात्यांच्या पैशाचा वापर करण्यात आला.हे बालिश कृत्य होते,असे सांगत ही बाप की मुंबई नहीं है, याद रखना! असाही इशारा दिला आहे.