वरळीत सिलिंडर स्फोट : ‘त्या’ चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, भाजप-समाजवादी पक्ष आक्रमक

77

वरळीतील कामगार वसाहतीमधील बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्प्त्यावर नायर रुग्णालयात उपचार करण्यात दिरंगाई करण्यात आली. या दिरंगाईबाबतचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यातील भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे नायर रुग्णालयातील वैद्यकीय उपचारातील दिरंगाईची चर्चा राज्यभर पसरली असून यामुळे महापालिका प्रशासनालाही आता शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे, तर समाजवादी पक्षाने या बाळाच्या मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

डॉक्टरांकडून जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिन्यांच्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष, असे चौघे जण भाजले होते. त्यानंतर चारही जखमींना तातडीने नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले, परंतु तिथे नेल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांकडून या जखमींच्या उपचारामध्ये दिंरगाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविले पण तिथे बालकाचा मृत्यू झाला.

(हेही वाचा उच्च शिक्षित तरीही १ हजार कामगारांच्या हाती झाडूच!)

जनसामान्यांचा रोष मुंबई महापालिकेवर ओढवला

या संबंधिचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओतील डॉक्टर आणि परिचारीकांची असंवेदनशीलता पाहून काळीज पिळवटून जाईल इतकी भयानक ही घटना आहे. सदर जखमींना वेळीच उपचार मिळाले असते, तर अशी भयंकर घटना टाळता आली असती. त्यामुळे प्रकरणाचा तीव्र निषेध करत असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या रुग्णांबरोबरच्या अमानवीय कृत्याचा निषेध करत समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी, व्हायरल झालेल्या यासंदर्भातील व्हिडिओमुळे डॉक्टर आणि परिचारिका यांचा अमानुषपणा दिसून आला आहे, अशी घटना कधीही आणि कुठेही घडू नये. या घटनेमुळे जनसामान्यांचा रोष मुंबई महानगरपालिकेवर ओढवला असल्याने यापुढील काळात महानगरपालिकेच्या हॉस्पिटलांवर लोकांचा विश्वास राहणार नाही, असे चित्र आहे. या कृत्याबाबत संबंधितांची कोणत्या प्रकारची चौकशी करण्यात येईल. संबंधितांवर एफ.आय.आर. दाखल करण्याची गरज आहे की नाही, अशा अनेक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची तातडीची सभा आयोजित करण्याची मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे. या रुग्णांना महानगरपालिकेमार्फत नुकसान भरपाई देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.