भाजप बेस्ट कामगार संघाच्या शिष्टमंडळाने दुपारी ३ वाजता कुलाबा येथे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची भेट घेतली. भाजप बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि गजानन नागे यांनी २०१६-२०२१ दरम्यान प्रलंबित राहिलेल्या वेतन करारावर सह्या केल्या. या करारानुसार बेस्ट कामगारांना ६५०० ते ११ हजार ५०० रुपयांपर्यंत पगारवाढ तसेच ७ व्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यावेळी बेस्टमधील काही महत्त्वांच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली.
( हेही वाचा : २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष! निवडणुकीत खर्गे यांचा दणदणीत विजय)
या बैठकीतील काही महत्त्वाचे मुद्दे
- दिवाळी बोनस दिनांक २१ रोजी शुक्रवारी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
- कामगारांचे हजेरी व रजा अॅप पुन्हा सुरू होणार
- तिकीटचे मशीन जर बिघडले तर कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जाणार याविषयी चर्चा करण्यात आली.
- ग्राउंड बुकिंग बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्राऊंड बुकिंग बंद करण्यात येईल.फक्त काही ठराविक ठिकाणी पीक पॉईंटला फक्त ग्राऊंड बुकिंग ठेवण्यात येईल.
- बसवाहक व चालक यांना निरिक्षक पदावर बढती दिली पण सेवावाढ मधील तफावत दिली नव्हती या त्रुटी महाव्यवस्थापकांना दाखवून त्या निरिक्षकांना न्याय देण्यात येणार. तसेच इतर सर्व वाहक /चालक तसेच उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार प्रमोशन देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. दररोज कामगारांना काम करताना भेडसावणाऱ्या समस्यांवर व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
- भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके, गजानन नागे, भाजप कामगार संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आनंद जरग, राजकुमार घार्गे, अनिल यादव, विजय माळवे, बबनराव बारगजे, संतोष काटकर, परेश चिले, ऋषिकेश खेडेकर, श्रीकांत गंलाडे, संजय वानखेडे, इत्यादी उपस्थित होते.
- शासनाने जाहीर केलेल्या ४५० कोटींच्या निधी आणि बोनसमुळे बेस्ट कामगारांची दिवाळी गोड झाली आहे म्हणून भाजप बेस्ट कामगार संघाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.