उन्मळून पडलेल्या झाडांचा असाही केला नगरसेवकाने उपयोग

मुंबईत तौक्ते चक्रीवादळात अनेक झाडांची पडझड झाली. परंतु या पडझड झालेल्या झाडांची कापणी करुन रस्त्यांवरील वाहतुकीचा मार्ग खुला करण्यापलिकडे कुणीच विचार केला नाही. परंतु मुंबईत मात्र, एका नगरसेवकाने या उन्मळून पडलेल्या झाडांचा सुंदरतेने उपयोग करुन, उद्यानांची शोभा वाढवण्याचे काम केले आहे. या झाडांच्या खोडांचे विशिष्ट आकाराचे तुकडे करुन, त्याचा वापर बसण्यासाठी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एरव्ही ही झाडे कापून कुठे तरी स्मशानात नाहीतर अन्य ठिकाणी नेऊन टाकली जात. त्याच झाडांचा उपयोग उद्यानाच्या सुशोभीकरणासह आसन व्यवस्थेसाठी करण्याचा निर्णय घेत, त्या नगरसेवकाने प्रशासनातील उद्यान विभागासह सर्व नगरसेवकांसमोर आदर्श घालून दिला आहे.

असा केला उपयोग

दोन आठवड्यांपूर्वी तौक्ते वादळामुळे मुंबईतील सव्वा दोन हजार झाडांची पडझड झाली. यामध्ये विलेपार्ले येथील एम.जी. रोडवरील एक भले मोठे झाड उन्मळून पडले. सर्वप्रथम इतर नगरसेवकांप्रमाणे भाजपचे स्थानिक नगरसेवक अभिजित सामंत यांनी हे झाड कापून, हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम केले. परंतु हे झाड कापत असताना या झाडाच्या खोडाचा भाग पाहता त्यांनी हे झाड साधारणतः अडीच ते तीन फुटाच्या अंतराएवढे कापण्याच्या सूचना केल्या. अशाप्रकारे त्यांनी त्याचे तीन ते चार तुकडे करुन घेतले आणि नजिकच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानात ते बसण्याचा निर्णय घेतला. या लाकडांच्या ठोकळ्यांवर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करुन, तसेच ते रंगवून उद्यानात बसवण्याची रचना केली जात असल्याचे, सामंत यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः ग्लोबल गुरुजी डिसले सर झाले जागतिक बॅंकेचे सल्लागार!)

पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण

याबाबत बोलताना सामंत म्हणाले, हे झाड कापत असताना त्याचे खोड पाहून, याचे तुकडे केल्यास बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था होईल, याची कल्पना आली. सर्वसाधारणपणे आपण मोठमोठ्या बंगल्यांमध्ये अशाप्रकारची आसन व्यवस्था पाहत असतो. त्यामुळे याच खोडाचा वापर आपण आपल्या उद्यानांमध्ये करू, या विचाराने या खोडाचे तुकडे करुन घेतले. आता सावरकर उद्यानामध्ये याची आसन व्यवस्था निर्माण केली जात असल्याने, विभागातील लोकांनाही ही कल्पना आवडली आहे. त्यामुळे या भागात जी अन्य झाडे पडलेली आहेत, त्यांचेही अशाचप्रकारे तुकडे कापून घेत त्याचा वापर इतर उद्यानांमध्ये केला जाणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. सामंत यांनी केलेला हा विचार जर मुंबईतील सर्व नगरसेवकांनी केल्यास, मुंबईतील सर्व उद्यानांमध्ये आकर्षक अशी नैसर्गिक आसन व्यवस्था पाहता येणार आहे. ज्या आसनांवर बसताना पर्यटकांना निश्चितच आनंद मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here