स्वत:चे दु:ख विसरत, त्या झटल्या लोकांसाठी!

189

तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडून मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, वादळामुळे अनेकांच्या घरांवर झाडे पडून, तसेच पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. लोकांच्या होणाऱ्या नुकसानाची काळजी घेताना, मुंबईतील एका नगरसेविकेला आपल्या राहत्या इमारतीत लागलेल्या आगीच्या दु:खाचाही विसर पडला होता. लोकांच्या दु:खावर फुंकर मारताना स्वत:वर ओढवलेल्या संकटाचाही विसर पाडणारी, ही घटना मागील आठवड्यात कांजूरमार्ग परिसरात अनुभवायला मिळाली आहे. जनसेवेला वाहून घेणारी ही नगरसेविका जेव्हा लोकांच्या घरांमध्ये शिरलेले पाणी कसे कमी होईल यासाठी प्रयत्नशील होती, तेव्हा त्यांच्या इमारतीतील एका मजल्यावर लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान पाण्याने विझवण्याचा प्रयत्न करत होते.

काय घडले नेमके?

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक झाडे कोसळून लोकांच्या घरांचे नुकसान झाले. परंतु त्याच वेळी अनेक भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. अशाचप्रकारे कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडसाठी केलेल्या भरावामुळे आसपासच्या छत्रपती नगरसह इतर भागांमधील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. याबाबतची तक्रार मिळताच स्थानिक भाजप नगरसेविका सारीका मंगेश पवार आपला मोर्चा तिथे वळवणार, एवढ्यातच त्यांच्या राहत्या इमारतीतील वरच्या मजल्यावर आग लागली. त्यामुळे त्यांनी तात्काळ सर्व नागरिकांना आधी इमारतीतून बाहेर काढले. तोवर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. यापुढचे काम हे अग्निशमन दलाचे असल्याने, पवार यांनी अंगावर रेनकोट चढवत छत्रपती नगर गाठले. जिथे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भरावामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.

Screenshot 2021 05 25 184428

(हेही वाचाः …तर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कालावधी ७ वर्षांचा)

लोकांना दिलासा देण्यासाठी…

भर पावसात त्यांनी महापालिकेच्या यंत्रणांची मदत घेऊन तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या नाल्यातील पाण्याचा मार्ग बदण्याचा प्रयत्न केला. या भरावामुळे लोकांच्या घरात पाणी तुंबण्याची भीती त्यांनी आधीच वर्तवली होती. त्यामुळे त्यांनी तेथील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केला. यासंदर्भात सारीका मंगेश पवार सांगतात की, मी राहत असलेल्या इमारतीच्या वरच्या एका मजल्यावर आग लागली होती. पण आम्ही लोकांना सुरक्षित खाली उतरवले होते. परंतु ही आग लागण्याआधी छत्रपती नगरमधील नागरिक आमच्या घरांमध्ये पाणी शिरले असे वारंवार सांगत होते. माझ्या इमारतीला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान विझवतील, पण माझे याठिकाणी उपस्थित राहणे योग्य नसून घरात पाणी शिरल्याने जे लोक भयभीत झाले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी मी तिथे असणे आवश्यक होते. त्यामुळे इथे आमच्या इमारतीतील आग विझवली जात होती आणि दुसरीकडे त्याच वेळी मी छत्रपती नगर येथे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तिथे पोहोचले होते.

WhatsApp Image 2021 05 25 at 4.49.13 PM

पाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्रास

त्याठिकाणी पोहोचले तर गुडघाभर पाणी तुंबले होते. मग महापालिकेच्या यंत्रणांची मदत घेऊन त्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला. मुळात जेव्हा हा भराव टाकला होता, तेव्हा पावसाचे पाणी जाण्यासाठी कुठलाही मार्ग ठेवला नव्हता. पण आपण महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांपासून ते पर्जन्य जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्यानंतर भरावामधून पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. परंतु तिथे पाणी साचूनच राहत असल्याने आधीपासूनच या साचणाऱ्या पाण्यामुळे येथील नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. त्यातच पावसामुळे याचठिकाणी आणखी पाणी साचून ते लोकांच्या घरांमध्ये शिरले, असे त्यांनी सांगितले. तसेच आग वेळीच आटोक्यात आणत मोठी हानी टाळल्याने त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचेही आभार मानले आहेत.

(हेही वाचाः महापालिका कोरोनाबाबत खरोखरच गंभीर आहे का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.