पावसाळी शेड चार महिन्यांकरता कशाला? वर्षभराकरता परवानगी द्या! भाजपची मागणी

75

मुंबईतील अनेक हॉटेल्स आणि दुकानदारांना पावसाळ्यात चार महिन्यांकरता तात्पूरती शेड बांधण्यास परवानगी दिली जाते. परंतु त्यानंतर ती शेड न काढता वर्षभर ती शेड अनधिकृतपणे कायम ठेवली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या शेडला वर्षभराकरता शुल्क आकारून परवानगी देण्यासाठी प्रचलित धोरणात बदल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी केली आहे.

मोठे आर्थिक नुकसान होते

त्यांनी आपल्या ठरावाच्या सुचनेत म्हटले आहे की, मुंबईत महानगरपालिकेच्यावतीने व्यावसायिक आस्थापनांना पावसाळ्यामध्ये १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी काही अटी व शर्ती सापेक्ष शेड बांधण्याची रितसर परवानगी देण्यात येते. परंतु, मुंबईतील दुकानदार, उपाहारगृहांचे मालक व इतर व्यावसायिक आस्थापना पावसाळयात चार महिन्यांच्या कालावधीकरिता शेड बांधण्याच्या नावाखाली अनधिकृतरित्या जवळपास वर्षभर ही शेड तशीच ठेवत असल्याचे निदर्शनास येते. पण महानगरपालिकेचे याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे, मोठे आर्थिक नुकसान होते, शिवाय गैरव्यवहार होत असल्याचा संशयही निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून दुकाने, उपाहारगृहे व इतर व्यावसायिक आस्थापानांना विविध अटी व शर्तीसापेक्ष वर्षभरासाठी शेड बांधण्याची परवानगी देता येईल, अशा रितीने, व्यावसायिक आस्थापनांना शेड बांधण्याकरिता परवानगी देण्यासंदर्भात प्रचलित धोरणात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी आसावरी पाटील यांनी केली आहे. जेणेकरून मुंबई महानगरपालिकेच्या महसुलातही भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा : भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी लोढा असणे शिवसेनेच्या पथ्यावर)

अभियंता हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात

मुंबई महापालिकेत तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व महापालिका सहायक आयुक्त यांना निर्देश देत चार महिन्यांनंतर मान्सून शेड न काढल्यास संबंधित अस्थापनांवर कडक कारवाई करण्यास सांगितले होते. पण यावर सहायक आयुक्त यांचे लक्ष नसून विभागाचे कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असतात. तसेच कोविड पूर्वी शिवसेना युवासेना अध्यक्ष व विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांची भेट घेत हॉटेल्सना मान्सून शेड बांधण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी मान्सून शेड बांधण्यास परवानगी दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.