‘दार उघड उद्धवा दार उघड’

महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मंदिरे सुरु करा, या मागणीसाठी भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घंटानाद आंदोलन केले असून, यावेळी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा भाजपा नेत्यांनी दिल्या. ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, उघडले मॉल्स, उघडली मद्यालये मुख्यमंत्रीजी कधी उघडताय आमची देवालये? केंद्र सरकारची नियमावली सहा आदेश कुंभकर्णी शासन देईना ना संदेश अशा घोषणा देत मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या ठिकाणी भाजपाचे ‘घंटानाद’ आंदोलन

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, श्रीक्षेत्र देहू, नाशिक येथील रामकुंड, पुण्यात सारसबाग गणपती, कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, शिर्डि येथील साई मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी म्हणजे देवावर विश्वास नसलेली ‘भूतं’

उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भूतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळे तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे लागत असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर टीका केली आहे. दारूची दुकाने सुरु करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर १० हजार मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

देशातल्या अनेक राज्यांनी धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप अशी परवानगी दिलेली नाही. सर्व नियम व बंधने पाळून मंदिरे उघडण्याची परवानगी राज्य सरकारने त्वरित द्यावी. सध्याच्या काळात सामान्य माणसाला देवाचा,मंदिरांचा मोठा मानसिक आधार मिळू शकतो.
देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here