स्थायी समितीत बोलू न दिल्याने भाजप आक्रमक! अध्यक्षांच्या दालनाबाहेर रात्री उशिरापर्यंत धरणे

141

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या सदस्यांना बोलू न दिल्याने भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मारल्याने अखेर शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्यांनी त्या आंदोलनात सहभागी होत भाजप विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे नक्की आंदोलन कुणाचे आणि कुणाच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे, असा प्रश्न सर्वांना पडत होता. दरम्यान  या घोषणाबाजीतच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण मागील १० ते १५ सभेत भाजपच्या सदस्यांनाच अधिक बोलायला दिले असे सांगत केवळ याचे राजकारण करू नका,  असे सांगत त्यांची मनधरणी केली. परंतु भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मागच्या बैठकांचे सोडा, या बैठकीतील विषय क्रमांक ५१ वर का बोलू दिले नाही याचे उत्तर द्या, असे सांगत त्यांनी आता माघार नाहीच, असे सांगत रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन करत सत्ताधारी पक्षाला घाम आणण्याचा प्रयत्न केला.

पदपथांच्या सुशोभिकरणांचा प्रस्ताव मंजुरीला आला

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षांनी विषय क्रमांक ५१ या अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता (पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो ते साकीनाका जंक्शन), जुहू – विले पार्ले जंक्शन, जुहू (के / पश्चिम विभाग), जोगेश्वरी-विक्रोळी आणि साकी विहार रोड जंक्शन, अंधेरी (के/पश्चिम विभाग), साई स्टार जंक्शन, कांदिवली (आर / दक्षिण विभाग), एम.जी रोड आणि साकी विहार जंक्शन मथुरादासपर्यंत व साकी विहार रोड जंक्शन, कांदिवली (आर/दक्षिण विभाग) आर्या समाज चौक, मुलुंड (टी विभाग), या पदपथांच्या सुशोभिकरणांचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर धरणे धरत त्यांच्या विरोधात घोषणा बाजी केली. समिती अध्यक्ष हाय हाय. . . महापालिकेतील वाझे कोण यासह शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरु असतानाच शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहनेत्या विशाखा  राऊत यांच्यासह भाजपच्या सदस्यांच्या मधेच उभे राहत त्यांच्या घोषणबाजीविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण होत एकमेकांविरोधातील घोषणाबाजीने महापालिका मुख्यालय दणाणून गेले होते.

मी मागील १० ते १५ समित्यांमध्ये भाजपच्या सदस्यांना बोलू दिलेले आहे. त्याचे पुरावेच आहेत. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या तुलनेत भाजपच्या सदस्यांनाच अधिक बोलायला दिले आहे. ज्या विषय क्रमांक ५१ वर ते बोलत आहेत, तो विषय पुकारल्यानंतर काही सेकंद थांबलोही होतो, पण ते न बोलल्यामुळे बहुमताच्या जोरावर तो प्रस्ताव संमत केला. पण ते केवळ राजकारण करण्यासाठीच असे आरोप करत आहेत.
– यशवंत जाधव, अध्यक्ष स्थायी समिती

दोन्ही पक्षाचे नगरसेवक आपापसांत भिडलेले असतानाच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रभाकर शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तब्बल १० ते १५ मिनिटे समजूत घातल्यानंतरही त्यांनी मानायला तयार नसल्याने अखेर जाधव आपल्या सर्व सदस्यांसह दालनात निघून गेले. परंतु उशिरापर्यंत भाजपचे प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, राजेश्री शिरवाडकर, कमलेश यादव, मकरंद नार्वेकर, विद्यार्थी सिंह, हरीश भांदिर्गे आदींचे धरणे आंदोलन सुरुच होते.

आंदोलन करणाऱ्यांनाच अध्यक्षांकडून चहा बिस्कीटे

स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर बसलेल्या भाजपच्या सदस्यांची मनधरणी केल्यानंतरही ते ऐकायला तयार नसल्याने अखेर यशवंत जाधव यांनी निदर्शने करणाऱ्यांना चहा व बिस्कीटे खाऊ घातली. एवढेच नाही तर आपण माझ्या दालनात येत नाही, म्हणून मी स्वत: आपल्यासोबत बाहेर येवून चहा पितो असे सांगत ते त्यांच्यासोबत येवून बसले. त्यामुळे राजकारणापलिकडील एक मैत्री असते, ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

रस्ता व पदपथ सुशोभीकरणासंबंधी प्रस्ताव स्थायी समितीत आला असता त्यात अनियमितता असल्याने भाजपच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, समिती अध्यक्षांनी भाजपच्या सदस्यांना बोलू दिले नाही व प्रस्ताव घाईघाईने मंजूर केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भाजप स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. स्थायी समिती अध्यक्षांची अरेरावी सुरू असून त्यांच्या मर्जीप्रमाणे केवळ  काही प्रस्तावांवर  चर्चा होते. इतर अर्थपूर्ण प्रस्तावावरील अनियमिततेबाबत भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतल्यास त्यांना बोलू दिले जात नाही ही सरळ हुकूमशाही असून हा प्रकार लोकशाही मूल्यांची गळचेपी करणारा आहे.  याप्रस्तावाबाबत आमचे काही मुद्द होते, प्रस्ताव जर प्रशासनाने आणला आहे, तर आमचे प्रशासनाला प्रश्न होते आणि ते आम्ही अध्यक्षांच्या माध्यमातूनच विचारणार होतो. परंतु अध्यक्षांना तेही ऐकून घेता येत नाही, मग आम्ही कुणाला प्रश्न विचारायचे?
– प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप,

विरोधी पक्षनेत्यांकडूनही मनधरणी

भाजपचे सदस्य अध्यक्षांच्या दालनाबाहेर संध्याकाळी सहा नंतरही बसून असल्याची माहिती मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते राखी जाधव यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतरही भाजपचे सदस्य यावर आग्रही राहिले आणि धरणे आंदोलनातून आता माघार नाही,असे सांगत रात्री उशिरापर्यंत ते अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मारुन होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.