रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या कुटुंबांसाठी ‘ही’ आहे खुशखबर!

66

घाटकोपर ते ठाणे या दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत, त्यामध्ये ३० ते ३५ वर्षांपासून रहिवाशी रहात आहेत, आता त्यांना रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मात्र त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत केली आहे. त्याची केंद्र सरकार दखल घेईल आणि पुनर्वसनासाठी मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग ते ठाणे दरम्यान मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चाळी बांधल्या जात आहेत. त्यात हजारो कुटुंबे मागील ३०-३५ वर्षांहून अधिक काळ रहात आहेत. या कुटुंबांना गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेकडून नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे रुळावर वर्षानुवर्षे राहणाऱ्या या मध्यमवर्गीयांना बेघर होण्याचा धोका आहे.

पुनर्वसनासाठी मंडळ स्थापन करावे

भाजपचे स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. घाटकोपर ते ठाणे दरम्यान रेल्वे रुळालगत राहणाऱ्या लोकांच्या बेघरांचा प्रश्न सोडविण्यासाठी जलदगती पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले खासदार मनोज कोटक?

रेल्वे रुळालगतच्या भागात ३०-३५ वर्षांपासून रहिवाशी रहात आहेत. या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासन, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण यांना आधी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी योजना आखण्याचा आदेश दिला आहे. मात्र रेल्वेने पुनर्वसनाची योजना न सांगताच नोटीस दिली आहे. त्यामुळे कोटक यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते ठाणे दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, स्थानिक महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने पुनर्वसनाचा आराखडा तयार करावा, तसेच प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम करण्यासाठी विशेष मंडळ स्थापन करावे. त्यामुळे नोटीस मिळाल्याने भीतीच्या वातावरणात जगणाऱ्या हजारो स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळू शकेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.