ठाण्यात भाजपचे… ‘वॉर अगेंस्ट टँकर माफिया’!

121

घोडबंदरमधील तीव्र पाणी टंचाईवर अनेक तक्रारीनंतरही उपाय योजना करण्यात येत नसून टँकर माफियांना पोसण्याचे काम सत्ताधारी शिवसेना करीत आहे. या विरोधात आमदार संजय केळकर यांनी वॉर अगेंस्ट टँकरमाफिया ही लोक चळवळ सुरू केली असून केवळ दोन दिवसांत या चळवळीला अडीच हजारहून जास्त नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

यल्गार परिषद घेऊन पाणी मोहीम तीव्र करणार

पोकळ आश्वासने देऊन नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेमुळे मे महिन्यात भीषण पाणी टंचाई भेडसावणार आहे. जोपर्यंत घोडबंदरसह उर्वरित ठाण्यात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत ठाणे महापालिकेने शहरात नविन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी सूचना केळकर यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. मोठमोठ्या प्रकल्पांचे डमरू वाजवणारी शिवसेना ठाणेकरांच्या मुलभूत गरजाही पुरवु शकत नसल्याने लवकरच यल्गार परिषद घेऊन पाणी मोहीम तीव्र करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.

(हेही वाचा – … तर आभाळ कोसळणार का? वानखेडेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल)

घोडबंदर परिसरातील रहिवाशांना पाणी टंचाईची समस्या

ठाण्यातील घोडबंदर परिसरात पाणी व अन्य मुलभूत सुविधाची बोंब असतानाही ठाणे महापालिकेद्वारे नविन बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याने येथील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची बिले भरूनही पाणी टंचाईमुळे येथील गृहसंकुलांना लाखो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागत आहेत. याविरोधात घोडबंदर परिसरील रहिवासी मधु नारायणन उन्नी व ठाणे शहर भाजपा चिटणीस दत्ता घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकिल ॲड. सुरीन उसगांवकर यांच्यामार्फत ठाणे महापालिका आयुक्तांना ११ ऑक्टोबर २०१७ चा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षीत केल्याबद्दल जानेवारीत नोटीस बजावली होती. या कायदेशीर नोटीशीला उत्तर देताना पालिकेने सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. दरम्यान वॉर अगेंस्ट टँकरमाफिया या लोक चळवळीला घोडबंदर भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला असून यात सामाजिक संस्था, संघटनांचा लक्षणीय सहभाग आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.